महाराष्ट्र खाकी (पिंपरी – चिंचवड / विवेक जगताप ) – पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेला बळकटी: प्रत्येक व्यावसायिक आस्थापनात सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्याची मागणी शहरातील नागरिक, महिला, व्यापारी आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पिंपरी-चिंचवड शहरात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नगरसेविका कविता भोंगाळे पाटील यांनी नुकतीच महापालिका आयुक्तांची भेट घेऊन शहरात ‘प्रत्येक व्यावसायिक आस्थापनामध्ये किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक’ करण्याबाबतचे निवेदन सादर केले आहे.
वाढत्या शहरीकरणामध्ये सुरक्षेच्या उपायांना अधिक प्रभावी बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर मांडण्यात आलेल्या या प्रस्तावामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
कविता भोंगाळे पाटील यांच्या प्रमुख मागण्या
शॉप अॅक्ट नियमांत समावेश: नवीन शॉप अॅक्ट (Shop Act) नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रियेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची अट सक्तीची करण्याची मागणी.
फुटेज जतन करण्याची मुदत: प्रत्येक आस्थापनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज किमान ३० दिवस सुरक्षित ठेवणे बंधनकारक करणे.
समन्वय यंत्रणा: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय यंत्रणा उभारणे.
‘सुरक्षित, सजग आणि स्मार्ट पिंपरी-चिंचवड’ घडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. या निर्णयामुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसेल आणि महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेत मोठी भर पडेल,” असा दृढ विश्वास नगरसेविका कविता भोंगाळे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून या सकारात्मक प्रस्तावावर लवकरच योग्य निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. नागरिक आणि व्यापाऱ्यांकडूनही या उपक्रमाचे स्वागत होत आहे.





