Home » पोलीस » Latur police लातूर LCB पोलिसांची धडाकेबाज कारवाई आंतरराज्यीय जनावरे चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ४१ गुन्हे उघड, ३ आरोपी जेरबंद

Latur police लातूर LCB पोलिसांची धडाकेबाज कारवाई आंतरराज्यीय जनावरे चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ४१ गुन्हे उघड, ३ आरोपी जेरबंद

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) –  शेतकऱ्यांच्या कष्टाने जोपासलेल्या जनावरांवर डल्ला मारून त्यांची कत्तल करणाऱ्या आणि लाखो रुपयांचा काळाबाजार करणाऱ्या एका आंतरराज्यीय जनावरे चोरट्यांच्या टोळीचा लातूर जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. लातूर पोलिसांच्या या ऐतिहासिक व धडाकेबाज कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यातून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत परभणी जिल्ह्यातील तीन सराईत आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्यांच्याकडून तब्बल २४,६८,००० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कारवाईमुळे लातूर जिल्ह्यातील २४ आणि बाहेरील जिल्ह्यांतील १७ अशा एकूण  ४१ गंभीर गुन्ह्यांची उकल झाली आहे.

अशी होती कारवाईची पार्श्वभूमी
लातूर जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या जनावरे चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्ग अत्यंत त्रस्त झाला होता. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या. अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण** यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि विविध जिल्ह्यांमध्ये गोपनीय तपास करत या टोळीचा माग काढला.

फिल्मी स्टाईलने आवळले मुसक्या
दि. ०६ ऑगस्ट २०२६ रोजी किनगाव ते पिंपळखेड रस्त्यावरील शिरसाठवाडी फाटा परिसरात जनावरे चोरी करणारे हरियाणा राज्यातील सराईत गुन्हेगार व त्यांचे साथीदार काही व्यवहारासाठी जमल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
माहिती मिळताच पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराला वेढा घातला. पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पिकअप वाहनातून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी पाठलाग करून तीन जणांना जेरबंद केले.

जेरबंद करण्यात आलेले आरोपी
१. अतिक सुलतान कुरेशी (रा. गंगाखेड, जि. परभणी)
२. मुजाहिद बाबू खाटीक (रा. परभणी)
३. साजू गफार कुरेशी (रा. पालम, जि. परभणी)
दरम्यान, हरियाणा राज्यातील नियाज उर्फ महंमद नवाब, आस मोहम्मद सिरदार यांच्यासह इतर चार साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

एकाच कारवाईत ४१ गुन्हे उघड
पोलिसांच्या कसून चौकशीत आरोपींनी लातूर, बीड, जालना, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील विविध गावांमधून बैल, गायी, म्हशी आणि वासरे चोरी करून त्यांची कत्तल केल्याची व मांस विक्रीतून लाखो रुपयांची कमाई केल्याची कबुली दिली.  लातूर जिल्ह्यातील रेणापूर, जळकोट, लातूर ग्रामीण, उदगीर ग्रामीण, चाकूर, किनगाव, अहमदपूर, औसा, कारार शिरसी येथील दाखल २४ गुन्हे उघडकीस आले आहेत. आणि बीड, जालना, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांतील १७ गुन्हे उघडकीस आले असून संबंधित पोलीस ठाण्यांना याची माहिती देण्यात आली आहे. जनावरांची चोरी करून मांस विक्रीतून मिळालेली २४,६८,००० रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली असून, या कारवाईमुळे अनेक महिन्यांपासून झोप उडालेल्या शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

LCB पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सपोनि पांडुरंग माने, पोउपनि राजेश घाडगे, अमर केंद्रे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने अत्यंत धाडस, चिकाटी व कौशल्याने पार पाडली.

Share This News

Related Post

National