महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही शहरातील गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीत आणि विशेष म्हणजे पोलीस स्टेशन च्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पान टपरीवर सर्रासपणे गुटखा विकला जात आहे. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतरही गांधी चौक पोलीस स्टेशनची कारवाई होत नसल्याने त्यांच्या आदेशाचे पालन होत आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा आणि रुग्णालयाजवळही गुटखा मिळत असल्याने गांधी चौक पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर शंका उपस्थित होत आहे. बंदी असलेला गुटखा खुलेआम विकला जात असून, त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येते. पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या आदेशानुसार, शहरातील बेकायदा धंद्यांवर कडक कारवाई केली जात
असताना, गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पान टपरीवर गुटखा विक्री राजरोस सुरू असल्याने पोलिस अधीक्षकांच्या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ व नशामुक्त महाराष्ट्राच्या उद्दिष्टांना यामुळे सुरुंग लागण्याची शक्यता आहे. परिणामी, पोलिस अधीकार्यानी गुटख्याच्या बेकायदा विक्रीकडेही लक्ष द्यावे, असे गांधी चौक पोलिसांना म्हणण्याची
वेळ आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य अमली पदार्थमुक्त करण्याची व्यापक मोहीम सुरू आहे. या मोहिमेच्या जाहीर घोषणा होत असताना गुटख्यासारख्या पदार्थांचा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीत बिनधास्त होणाऱ्या विक्रीमुळे गांधी चौक पोलिसांची कार्यपद्धती फोल ठरत आहे. गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील गल्लीबोळांतील टपऱ्या, किराणा दुकानांत सहज
गुटखा मिळतो. गुटखा विक्रीवर बंदी असताना, तो मिळतो कसा? शहराच्या गजबजलेल्या आणि प्रसिद्ध असलेल्या गोलाई भागात आणि पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिवसाढवळ्या चालणाऱ्या या विक्रीकडे गांधी चौक पोलिसांचे लक्षच नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पोलिसांच्या मूक संमतीने हे व्यवहार सुरू असल्याची कुजबूज होत आहे. बेकायदा गुटखा विक्रीवर आळा घालण्यासाठी केवळ मोहिमा नव्हे, तर ठोस कारवाई हवी. पोलिस अधीक्षकांनी या दिशेने तातडीने पावले उचलावीत,’ अशी जोरदार मागणी काही सामाजिक संस्थांकडून होत आहे.



