Home » राजकीय » “गोपीचंद पडळकर चड्डीत होते, तेव्हा शरद पवारांनी उभे केले आयटी हब” – पैगंबर शेख यांचा घणाघात

“गोपीचंद पडळकर चड्डीत होते, तेव्हा शरद पवारांनी उभे केले आयटी हब” – पैगंबर शेख यांचा घणाघात

महाराष्ट्र खाकी (पुणे / विवेक जगताप ) – “किल्लारी भूकंपापासून हिंजवडीपर्यंत शरद पवारांचे योगदान मोठे; पडळकरांनी इतिहास जाणून बोलावे” आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पैगंबर शेख यांनी जोरदार पलटवार केला आहे. शेख यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत पडळकरांवर निशाणा साधत, “गोपीचंद पडळकर ज्यावेळी चड्डीत होते, त्यावेळी शरद पवारांनी हिंजवडी येथे आशियातील मोठे आयटी हब उभे केले होते. त्या प्रकल्पामुळे आज लाखो युवक-युवतींना रोजगार मिळत आहे,” असे म्हटले.

ते पुढे म्हणाले, “किल्लारीच्या विनाशकारी भूकंपानंतर उद्ध्वस्त झालेल्या लाखो कुटुंबांना पुन्हा उभे करण्याचे ऐतिहासिक काम शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झाले. आपत्ती व्यवस्थापनाचा आदर्श आजही किल्लारी भूकंप आणि शरद पवार यांच्या कार्यातून दिला जातो. याची माहिती पडळकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही घ्यावी.” पैगंबर शेख यांनी पुढे म्हटले की, “शरद पवार यांचे राजकारण कोणाला पटो अथवा न पटो, पण ते नेहमी तळागाळातील जनतेला सक्षम करणारे राहिले आहे. त्यांचे राजकारण लोकांना आधार देणारे आहे, भिकेला लावणारे नाही.” या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता असून, पडळकर या टीकेला काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share This News

Related Post

National