महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – निलंगा मतदारसंघातील आरोग्य सेवांना अधिक चांगले आणि मजबूत करण्यासाठी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली. या भेटीत मतदारसंघातील आरोग्य संबंधित समस्या आणि मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. आमदार निलंगेकर यांनी नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी महत्त्वाच्या मागण्या आरोग्यमंत्र्यांकडे केल्या.
प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे
आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती
शिरूर अनंतपाळ आणि औराद शहाजानी येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात.
प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा वाढवणे
वलांडी, निटूर, साकोळ, बोरोळ, हलगरा, पानचिंचोली आणि अंबुलगा बु. या सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, जेणेकरून अधिक रुग्णांना चांगली सेवा मिळू शकेल.
नवीन इमारतींसाठी निधी
बोरसुरी, अनसरवाडा, शेडोळ, जवळगा, दवणहिप्परगा आणि हिप्पळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन इमारती आणि कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या जागांसाठी निधीची तरतूद करण्यात यावी.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या भेटीमुळे निलंगा मतदारसंघातील आरोग्य सेवेत लवकरच सुधारणा होईल, असा विश्वास आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे. निलंगा मतदारसंघातील ग्रामीण भागातील लोकांना आता चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आमदार निलंगेकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदल होत आहेत.



