महाराष्ट्र खाकी ( लातूर/ विवेक जगताप ) – पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी अवैध सावकारीच्या भयावह राक्षसाला थेट आव्हान दिले आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या खासगी सावकारांच्या मनमानीला आता पूर्णविराम लागणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना सख्त निर्देश दिले आहेत की, सावकारीच्या प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घ्या आणि तात्काळ गुन्हे दाखल करा. कोणतीही तक्रार बाजूला टाकण्याची किंवा रद्द करण्याची वेळ आता संपली आहे. प्रत्येक तक्रार ही लाल फितीत अडकवण्याची सवय आता मोडून काढण्यात येणार आहे.
“शेतकरी कर्जाच्या मोहात सापडून सावकारांच्या जाळ्यात अडकत आहेत. अनेक पटींनी व्याज वसूल करूनही कर्ज फिटल्याचे मान्य न करणे, धमक्या देणे, शिव्या गाळणे, जबरदस्तीने उचलून नेणे, शेती कब्जात घेणे, कोरे धनादेश आणि कागदपत्रांवर सही घेणे — हे प्रकार आता चालणार नाहीत,” असे संदेश देणारे पोलीस अधीक्षक तांबे यांनी नियमित आढावा बैठकीत या विषयावर विशेष नजर ठेवली आहे. प्रत्येक उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या क्षेत्रातील सावकारी प्रकरणांवर स्वतः नजर ठेवावी आणि कठोर कारवाई करावी, असे त्यांचे स्पष्ट आदेश आहेत. परवाना असलेल्या सावकारांनीही कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावरही तात्काळ कारवाई होणार आहे. परवान्यातील अटी धाब्यावर बसवून मनमानी करणाऱ्यांना आता कायद्याचा कठोर चाबूक लागणार आहे.
शेतकऱ्यांसाठी पोलीस दलाचे स्पष्ट आवाहन
1) कर्ज हवे असल्यास फक्त शासकीय बँका, सहकारी संस्था, पतसंस्था किंवा बचत गटांमधून घ्या.
2) रोख व्यवहार टाळा, बँक हस्तांतरण किंवा धनादेश वापरा.
3) कोणत्याही सावकाराकडून होणारा त्रास, धमकी किंवा जबरदस्ती सहन करू नका — तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा.
लातूर जिल्हा पोलीस दलाने स्पष्ट केले आहे की, प्रत्येक तक्रारीवर निष्पक्ष, त्वरित आणि कठोर कारवाई केली जाईल. आता शेतकऱ्यांच्या रक्त शोषण करणाऱ्या सावकारांच्या दिवस गणती सुरू झाली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या या आक्रमक भूमिकेला जिल्ह्यातील शेतकरी वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अवैध सावकारी संपवण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल खरोखरच स्वागतार्ह आहे. आता कृतीची वेळ आली आहे



