महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील, 28 गावे आणि 18 प्रभागात राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भव्य लोकार्पण आणि भूमिपूजन माजी मंत्री व लातूर शहरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मंगळवारी दुपारी एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीने वासनगाव येथील कार्यक्रमात उपस्थित राहून केले.आधी केले मग सांगितले या उक्तीचा प्रत्यय देत, मागच्या
पाच वर्षात लातूर मतदार संघात दोन हजार कोटी रुपये अधिक निधीच्या विविध विकास योजना राबवण्यात आल्या आहेत, यात समाजातील प्रत्येक घटकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला असल्याचे आमदार देशमुख यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. लातूर मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर, आदरणीय विलासराव देशमुख आणि आदरणीय दिलीपराव देशमुख , यांनी लोकांची बांधिलकी जपत, या
परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला
आहे, तीच बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न मी पुढे चालू ठेवला आहे असे सांगून त्यासाठी जनतेचा आशीर्वाद आणि पाठिंबा कायम कायम मिळत राहील असा विश्वास आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला, लोकसेवेचा वसा पुढे नेत असताना नेहमीच पारदर्शक कारभार करण्यावर भर दिला आहे, लातूर लातूरच्या प्रगतीला चालना देण्यासाठी येथील सामाजिक सलोखा आणि
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचा ही प्रयत्न केला आहे, आजवर जे काम केले आहे त्याचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडून भविष्यात लातूर शहर मतदार संघात आणखीन काय करायला हवे याच्या सूचना जनतेकडून मागवण्यात येणार आहेत, जनतेच्या सूचना हाच या मतदारसंघासाठी आपला जाहीरनामा असणार आहे, असे सांगून होऊ घातलेल्या निवडणुकीत जनतेने मला आशीर्वाद द्यावेत, काँग्रेस आणि महाविकास
आघाडीचा झेंडा विधानसभेवर फडकवण्यासाठी पाठिंबा
द्यावा अशी विनंती त्यांनी केली. यावेळी पूढे बोलतांना अमित देशमुख म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार
सत्तेत आल्यानंतर लगेच कोरोनाची महामारी आली. यातून आपल्या राज्याला सांभाळून पुन्हा उभे करण्याचे काम सरकारने केले. सर्व पूर्वपदावर येत असतानाच राजकीय घडामोडी घडल्या व महायुतीचे सरकार आले. मात्र हे
सरकार आल्यापासून सामान्य जनतेच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकरी, युवक, महिला, व्यापारी, उद्योजक असा कोणताही घटक समाधानी नाही. लोकसभेला मराठी जनतेने महाराष्ट्र धर्म दाखवून आघाडीला भरभरून यश दिले आहे. विधानसभेला देखील मराठी जनता पाठीशी राहील हा विश्वास आहे.