महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लातूर पोलीस दलाने कठोर कारवाई करत जिल्ह्याबाहेर हद्दपार केले आहे. लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवण्यात आली.
पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर हद्दीतील अभिषेक अशोक जावके (वय २७ वर्षे, रा. गायत्रीनगर, लातूर) या सराईत गुन्हेगाराविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, लातूर यांच्याकडे सादर करण्यात आला होता. प्रस्तावाची छाननी करून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी अभिषेक जावकेला लातूर जिल्हा तसेच लगतच्या धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव व कळंब तालुक्यांतून हद्दपार करण्याचा आदेश दिला.
दिनांक ३ जुलै २०२६ रोजी या आदेशाची अंमलबजावणी करत लातूर पोलीसांनी या गुन्हेगाराला जिल्ह्याबाहेर हद्दपार केले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात सफौ. संजय फुलारी, पोलीस अमलदार राहुल सोनकांबळे, बालाजी कोतवाड, प्रशांत ओगले, अंकुलगे, माने, शिंदे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
लातूर पोलीस दलाने स्पष्ट संदेश दिला आहे की, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना आता जिल्ह्यात ठिकाण नाही. समाजात शांतता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रतिबंधात्मक कारवाया सातत्याने सुरू राहतील. गुन्हेगारांना आता कठोर आणि कायदेशीर शिक्षा मिळणारच, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.



