महाराष्ट्र खाकी (नांदेड / प्रतिनिधी) — लातूर लोकसभा मतदारसंघाचे माजी लोकप्रिय संसद रत्न खासदार, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथील अधिवक्ता तथा उच्च विद्याभूषित व्यक्तिमत्त्व प्रा. डॉ. ॲड. सुनील बळीराम गायकवाड यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक कार्याबद्दल ‘संत गाडगे बाबा प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
संत गाडगेबाबा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष समारोह समिती महाराष्ट्र आणि संत चोखामेळा अध्यासन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे आयोजित तिसऱ्या संत गाडगे बाबा प्रबोधन परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. इंद्रजित भालेराव आणि प्रसिद्ध अभिनेते अनिल मोरे यांच्या हस्ते डॉ. गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी खासदार म्हणून कार्यरत असताना लातूर व नांदेड परिसराच्या विकासासाठी केलेल्या विविध विकासकामांची तसेच समाजातील वंचित घटकांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला. संत गाडगे बाबा यांच्या विचारांप्रमाणे स्वच्छता, शिक्षण, सामाजिक समता आणि मानवसेवा या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून डॉ. गायकवाड यांनी केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक सचिन पाटील, स्वागताध्यक्ष विठ्ठल पावडे, श्रीकांत देशमुख, ज्ञानेश्वर बंडगर महाराज, प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, बालाजी इबीतवार, रामेश्वर वाघमारे यांच्यासह साहित्य, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी संत गाडगे बाबा यांच्या समाजसुधारणेच्या विचारांना अभिवादन करत हा सन्मान जनसेवेची नवी प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. संत विचारांचा वारसा जपत समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा हा गौरव असल्याने या पुरस्काराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



