माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांचा विमा कंपनीला इशारा

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – खरीप हंगाम 2023 मध्ये प्रतिकुल परिस्थितीमुळे संभाव्य नुकसान जोखमीचा अहवाल सादर करून पीक विमा कंपनीने शेतकर्‍यांना नुकसान भरपाईच्या 25 टक्के आगाऊ (अग्रीम) रक्कम तात्काळ अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी देऊन त्याबाबत अधिसुचनाही काढली

होती. त्यानुसार पीक विमा कंपनीने रक्कम जमा न केल्याने माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी कंपनीला धारेवर धरुन प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. परिणामी विमा कंपनीकडून लातूर जिल्ह्यातील 32 मंडळांसाठी 194 कोटी रूपयांची अग्रीम पीक विमा रक्कम जमा केलेली आहे. मात्र उर्वरीत

28 मंडळांसाठी असलेली 205 कोटी रूपयांची रक्कमही कंपनीने विना विलंब व विना अडथळा जमा करावी अन्यथा कायदेशीर कारवाईला व शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलेला आहे. यावर्षी अल्प पाऊस व प्रतिकुल हवामान यामुळे जिल्ह्यातील

शेतकर्‍यांच्या हातातून खरीपाचा  हंगाम गेलेला आहे. खरीप हंगामाकरीता जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पीक विमा भरलेला असल्यामुळे संभाव्य नुकसान जोखमीचा अहवाल प्रशासनाकडे  सादर करण्यात आलेला होता. या अहवालानुसार पीक विमा कंपनीने शेतकर्‍यांना नुकसानभरपाईच्या 25 टक्के आगाऊ (अग्रीम) रक्कम

तात्काळ अदा करण्याचे आदेश देऊन त्या बाबतची अधिसुचनाही जिल्हाधिकार्‍यांनी काढली होती. मात्र या अधिसुचनेनंतरही पीक विमा कंपनीने शेतकर्‍यांना अग्रीम पीक विमा रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केली होती. याबाबत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा

केलेला होता. तसेच याप्रकरणी पीक विमा कंपनीसही धारेवर धरण्यात आले होते. अखेर पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील 32 मंडळासाठी 194 कोटी रूपयांची अग्रीम पीक विमा रक्कम जमा केलेली आहे. वास्तविक जिल्ह्यातील 60 ही मंडळांसाठी अग्रीम पीक विमा देण्यात यावा अशी अधिसुचना काढण्यात आलेली होती तरीही

कंपनीने केवळ 32 मंडळांसाठीच अग्रीम पीक विमा दिलेला आहे. जिल्ह्यातील उर्वरीत 28 मंडळातील शेतकर्‍यांनी याबाबत तक्रार केलेली असून त्यांना अग्रीम पीक विमा न मिळाल्याने त्यांच्यात कंपनीबद्दल संतापाची लाट पसरलेली आहे. त्यातच रब्बी हंगामातही शेतकर्‍यांच्या हाताला कांही लागणार नाही असे

जवळपास दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत येणार आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील उर्वरीत 28 मंडळांसाठी 205 कोटी रूपयांची अग्रीम पीक विम्याची रक्कम विना विलंब व विना अडथळा जमा करावी अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे

केलेली आहे. ही रक्कम तात्काळ जमा  न झाल्यास पीक विमा कंपनीला कायदेशीर कारवाई व शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलेला आहे. याबाबत शासन दरबारी पीक विमा कंपनीची तक्रार करून अशा विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी माजी मंत्री आ. निलंगेकर करणार आहेत.

Recent Posts