महाराष्ट्र खाकी (मुबंई / विवेक जगताप ) – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जतमधील गावांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर दोन्ही राज्यांमधील सीमाभागावरून सुरू असलेला वाद पुन्हा उफाळला आलाय. त्यातच काल बेळगावध्ये महाराष्ट्रातील सहा ट्रकवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी आक्रमक
भूमिका घेत कर्नाटकच्या बसेसना काळे फासले. त्यामुळे दोन्ही राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या परिस्थितीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक ट्विट करून केंद्र आणि राज्य सरकारवर आरोप केले आहेत. संजय राऊत आपल्या ट्विट मध्ये म्हणतात दिल्लीच्या पाठिंब्या शिवाय
बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे. उठ मराठ्या उठ !