महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यात मसलगा पाटीवर महामार्गाचे अर्धवट काम, शेतकऱ्याचे जमिनीचे संपादन, गोगलगाय चे संकट,पुराचे पाणी शेतकऱ्याच्या आदी प्रश्नांना वाच्या फोडण्यासाठी वेळोवेळी छावा संघटनेने लेखी निवेदन देऊनही शासन दरबारी नुसते आश्वासन मिळत असल्याने आज (दि. 10 ऑगस्ट ) छावा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांसह बैलगाडी घेऊन
लातूर जहीराबाद महामार्गावर छावा संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी बैलगाडी आडवी लाऊन भव्य रस्ता रोको केले . यावेळी लातूर जहीराबाद महामार्गाचे काम मसलगा पुलालगत अर्धवट केल्यामुळे अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले असून या रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे. तसेच हायवेलगत बसथांब्याचे काम पूर्ण करावे, पथदिवे लावावे, गोगलगाईने शेतकऱ्याची पिके
फस्त केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्वरीत हेक्टरी 75 हजार रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच सोळ नाला व मांजरा नदी काठाच्या सर्व जमीनी कायम बाधीत म्हणून घोषित करण्यात याव्यात तसेच मसलगा गावातील एकही बसेस फेरी कुठलेही कारण न सांगताना बंद करण्यात येऊ नये वरील आदी मागण्यासाठी हा रस्ता रोको छावा संघटनेचे निलंगा
तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांच्या नेतृत्वात करण्यात आला. तसेच मसलगा माजी सरपंच ज्ञानेश्वर पिंड, गुरूनाथ जाधव, बापुराव जाधव, गणी शेख, बाबासाहेब पाटील, मोहन पिंड, दत्ता पिंड, दिलीप जाधव, श्रीमंत पाटील, सतीश जाधव, विशाल पाटील, विजय चामे,व्यंकट शेळके, पंकज शेळके, बबन आरेराव, गोपाळ सलघंटे,दत्ता शिंदे, महमद सय्यद, हारून शेख, मलकु लव्हरे आदी उपस्थित होते.