महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात (दि 27 जून) आज सोमवार रोजी जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस लातूर मनपा आयुक्त अमन मित्तल अतिरिक्त आयुक्त शिवाजी गवळी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मंगेश गवारे, वाहतूक
नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार बिर्ला, जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक नागेश मापारी, लातूर जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पांडे, तसेच, शाळा प्रतिनिधी इत्यादींसह विविध विभागांचे सदस्य उपस्थित होते. “शालेय बस आणि व्हॅनद्वारे सुरक्षित वाहतुकीसाठी अनेक उपाययोजना केल्या पाहिजेत. कोविडच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांत बहुतांश शाळा
एकतर बंद किंवा अनियमित झाल्यामुळे, स्कूल बस सुरक्षितता नियमांमध्ये काही अंशी दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी नियमांची काटेकोर पालन व अंमलबजावणी करावी” असे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले. तसेच शाळांना विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे सर्व नियम पाळण्याच्या सूचना देऊन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मंगेश गवारे यांनी
सांगितले की,स्कूल बसमध्ये अटेंडंट असणे,स्कूल बसमध्ये मुली प्रवास करत असल्यास महिला अटेंडंट, खिडक्यांवर अतिरिक्त बार, अग्निशामक यंत्रे ठेवणे,वेगमर्यादा 40 किमी प्रतितास असावी याची खात्री करण्यासाठी स्पीड गव्हर्नर बसवणे, विद्यार्थ्यांना शाळेत सोडणे आदी उपायांचा समावेश आहे. बसची यांत्रिक स्थिती उत्तम असणे आवश्यक आहे. नियमानुसार बस 15 वर्षांपेक्षा
अधिक जुनी नसावी. शाळेची बस किंवा विद्यार्थ्यांची ने-आण करणारे वाहन हे पिवळ्या रंगाचे असावे. गजबजलेला रस्ता, कमी प्रकाश, धुके अशा परिस्थितीतही पिवळा रंग वाहन चालकाच्या लक्षात येतो म्हणून तो निश्चित करण्यात आला आहे. ही रंग छटा ‘स्कूल बस यलो’ अशीच ओळखली जाते. बसच्या दोन्ही बाजूच्या खिडक्यांखाली आणि पुढे चॉकलेटी रंगाचा पट्टा असावा.
या पट्ट्यावर शाळेचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, बस कंत्राटी असल्यास त्याचे तपशील पांढऱ्या रंगाने ठळकपणे लिहिलेले असणे आवश्यक आहे. बसच्या मागे आणि पुढे शालेय बस असे ठळक अक्षरात लिहिलेले असावे. बसवर कोणत्याही प्रकारची व्यावसायिक जाहिरात रंगवण्यास मनाई आहे. शाळेच्या एकापेक्षा अधिक बस असल्यास त्याचे क्रमांक बसच्या पुढील भागात ठळकपणे लावण्यात
यावेत. विद्यार्थ्यांना बसमध्ये सहज चढता-उतरता येईल अशा पायऱ्या असाव्यात. बसमध्ये विद्यार्थ्यांची दप्तरे, डबे ठेवण्यासाठी सुविधा असावी. आसने फार उंच नसावीत. खिडक्यांमध्ये तीन आडव्या दांड्या असाव्यात. दोन दांड्यांमधील अंतर 5 से.मी पेक्षा जास्त असू नये. शाळेच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा अपघात विमा काढलेला असणे आवश्यक आहे. शाळा
प्रशासनावर विमा काढण्याची जबाबदारी आहे. बसमध्ये आवश्यक औषधे आणि साहित्यासह प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अग्निशमन यंत्रणा असणेही गरजेचे आहे. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असणेही आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या नावांची यादी, इयत्ता, पत्ता, रक्तगट आदी तपशील, पालकांचे संपर्क क्रमांक यांची पुस्तिका प्रत्येक बसमध्ये असावी. बस
स्वच्छ, निर्जंतुक केलेली असावी. बसमध्ये एअर फ्रेशनर असावे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार शासनाने 2011 मध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी नियमावली तयार केली. असून त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासंदर्भात बैठक घेऊन संबंधित सर्व शाळा शाळांशी पत्रव्यवहार करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी स्कूल व्हॅन आणि बसेसना वाहनांच्या
फिटनेस चाचण्या घ्याव्यात. याशिवाय मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी ऑटोरिक्षाचा वापर करतात.ऑटोरिक्षा चालक त्यांच्या ऑटोमध्ये परवानगीपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणार नाही याची वाहतूक नियंत्रण शाखेने दक्षता घ्यावी.अशा सूचना पोलीस अधीक्षक यांचे कडून देण्यात आल्या. तसेच दिनांक 15/07/2022 ते 30/07/2022 दरम्यान अवैध
स्कूल बस व शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कार्यवाही करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येणार असून त्या अनुषंगाने संबंधित वाहनधारकांनी आवश्यक ते परवाने काढून घ्यावेत असे आवाहन लातूर पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.