राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य आमदार धिरज देशमुख यांची दुर्मिळ रंगीत करकोचा पक्ष्यांच्या वसाहतीला भेट

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील मसलगा येथील तलावाच्या पाणथळ क्षेत्रात नुकत्याच आढळलेल्या दुर्मिळ रंगीत करकोचा (चित्रबलाक) पक्ष्यांच्या वसाहतीला राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य आमदार धिरज देशमुख यांनी भेट देवून पक्ष्यांचे निरीक्षण केले. आपल्या भागात आढळलेल्या या पक्ष्यांचे व अन्य वन्यजीवांचे जतन,

संवर्धन करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भाने जैवविविधता समितीचे सदस्य, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व स्थानिक शेतकऱ्यांशी यावेळी चर्चा केली. सदरील तलावाच्या पानथळ परिसरात वन्यजीव छायाचित्रकार श्री धनंजय गुट्टे यांना रंगीत करकोचा पक्ष्यांची मोठी वसाहत आढळली. त्यानंतर बी एन एच एस

(बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी)चे उपसंचालक राजू कसंबे, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे, जैवविविधता समितीचे सदस्य शहाजी पवार, धनंजय गुट्टे, वन परिमंडळ अधिकारी निलेश बिराजदार यांनी या वसाहतीस प्रत्यक्ष भेट देवून पक्षांची गणना केली. या गणनेनुसार सध्या येथे सुमारे 250 रंगीत करकोचे त्यांच्या 400 पेक्षा अधिक पिलांसह राहत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एवढ्या

मोठ्या संख्येने ही पक्षी येथे राहत असल्याबद्दल आमदार धीरज देशमुख यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी येथील स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून याबद्दल जाणून घेतले. मासे, बेडूक यांसह शेतातील गोगलगाय वा अन्य कीटक हे पक्षी खात असल्याने या पक्षांचा उपद्रव नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आपल्या भागात असलेल्या या पक्ष्यांचा अधिवास व त्याचे जतन

करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू तसेच राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडे पक्षांचे संवर्धन करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले. यावेळी  त्यांनी पक्ष्यांचे निरिक्षण करण्याबरोबरच पक्ष्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपले.

Recent Posts