महाराष्ट्र खाकी (निलंगा / प्रशांत साळुंके) – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड च्या वतीने शैक्षणिक वर्ष 2020-21 चे शैक्षणिक अंकेक्षण जाहीर करण्यात आले. यात निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयास “अ” दर्जा जाहीर करण्यात आला आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठाकडून दरवर्षी सर्वच महाविद्यालयांचे नॅकच्या धर्तीवर असे
शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण केले जाते. यात महाविद्यालयात राबविले जाणारे विविध शैक्षणिक व इतर उपक्रम, भौतिक सुविधा, संशोधन व नवोपक्रम आणि सामाजिक कार्य या घटकांना अनुसरून तज्ञ समिती मार्फत प्रत्यक्ष महाविद्यालयास भेट देऊन ही पडताळणी केली जाते. बदलत्या काळानुसार व शिक्षण पद्धतीत झालेल्या बदलानुसार ग्रामीण व सीमावर्ती भागात महाविद्यालयात
विविध व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आले व विद्यापीठ पातळीवर आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. गुणवत्ता वाढीसाठी प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात येतात. बी.सी.ए., बी.व्होक, कला, विज्ञान, वाणिज्य या शाखेतून विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत महाविद्यालयाचे विद्यार्थी विशेष प्राविण्यासह दरवर्षी झळकतात. प्राध्यापकांना
संशोधन कार्यात प्रोत्साहन दिले जाते. या सर्व घटकांचा विचार करून 580 पैकी 499 गुण प्राप्त करुन महाविद्यालयाने हा दर्जा प्राप्त केलेला आहे. विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वसंत भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने महाविद्यालयास हा दर्जा दिलेला आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय शिवाजीराव
पाटील, सचिव मा. बब्रुवान भाऊराव सरतापे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, प्रा. प्रशांत गायकवाड व महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.