महाराष्ट्र खाकी ( लातूर) – महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला पण परराज्यात उत्पादीत होणारा गुटखा, सुंगधी तंबाखू आदी पदार्थ पोलिस पकडतात. तरीही लातूर शहरासह जिल्ह्यातील पान टपऱ्या आणि छोटे किराणा दुकानात हाच गुटखा अगदी सहजतेने उपलब्ध होतो. पोलिसांच्या हाती लागणारा गुटखा सापडतो. तो विकणाऱ्यांवर कारवाईपण होते, मात्र त्याची विक्री तरीही थांबत नाही, असेच चित्र गेल्या अनेक महिण्यापासून लातूर शहरासह जिल्ह्यात दिसत आहे. तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास हानीकारक असतात. यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांमुळे जीवही जातो.
या पार्श्वभूमीवर राज्यात गुटखा, सुगंधी तंबाखूच्या विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. दुर्देवाने इतर राज्यात गुटखा उत्पादनास बंदी नसल्याने तेथून तस्करी करून हा माल राज्यात येतो. मागील वर्षभरात पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी असा तस्करी होऊन येणारा गुटख्याचा साठा पकडला आहे . यामध्ये अनेक गुन्हे दाखल करीत पोलिसांनी बऱ्याच आरोपींना बेड्या ठोकल्यात. गुटख्याची तस्करी परराज्यातून होत असते. विशेषत: लातूर जिल्ह्यात आणि शहरात कर्नाटक राज्यातून मोठ्या आणि छोट्या वाहनांमध्ये गुटखा येतो.
कर्नाटकतून गुटखा आणणारे आणि पाठवणारे तस्कर हायवेने आणि कमीत कमी तपासणी होईल, अशा रस्त्याने लातूर जिल्ह्यात येतात. मात्र, माहिती मिळाली की पोलिस तपासणी नाके उभी करून कारवाई करतात , लातूर शहर आणि जिल्ह्यात स्थानिक बाजारपेठेत त्याची मागणी असल्याने हा प्रकार घडतो. यामुळे कारवाई करून गुटखा वा सुगंधी तंबाखू पकडणे, एवढे काम पोलिसांना सातत्याने करावे लागते. यासाठी एक विशेष पथक सतत कार्यरत असते. उदगीर, देवणी, शिरूर अनंतपाळ आणि निलंगा या तालुक्याच्या सीमेतून जिल्ह्यात गुटखा आणला जातो. कर्नाटक आणि जिल्हा सीमेवर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे मोठे – मोठे गोडाऊन आहेत. आणि शहरात ही असतील कारण शहरातील आणि जिल्ह्यातील प्रत्येक दुसऱ्या – तिसऱ्या छोट्या टपऱ्यावर गुटखा मिळतो असे भयानक चित्र सध्या लातूर जिल्ह्यात दिसून येत आहे.