महाराष्ट्र

करुणा शर्मा यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

महाराष्ट्र खाकी ( अंबाजोगाई ) – धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा वाद महाराष्ट्राला माहीत आहे. करुणा शर्मा काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांच्या गावी परळी येथे त्यांच्या घरी जाण्यासाठी परळीत आल्या होत्या. वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात करूणा मुंडे/शर्मा या 6 सप्टेंबरपासून न्यायालयीन कोठडीत होत्या . करुणा मुंडे/ शर्मा यांनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्या. सुप्रिया सापतनेकर यांच्या न्यायालयासमोर दोन्ही बाजू कडून युक्तिवाद झाले. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अशोक कुलकर्णी तर करुणा मुंडे/ शर्मा यांच्या वतीने अँड. भारजकर यांनी बाजू मांडली. करुणा मुंडे/ शर्मा यांनी पुन्हा बीड जिल्ह्यात येऊन अशा प्रकारचा कृत्य करू नये अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टासमोर ठेवली होती, तर करुणा शर्मा यांना जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात गुंतवण्यात आल्याचा युक्तिवाद अँड. भारजकर यांनी केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने यावर मंगळवारपर्यंत निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी 25 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. आता करुणा मुंडे/ शर्मा पुढे काय पाऊल उचलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Most Popular

To Top