लातूर मनपा दररोज करणार 4 लक्ष 80 हजार लिटर पाण्यावर पुनर्प्रक्रिया, एका प्रकल्पचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने जैविक पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया करणारा राज्यातील पहिला सांडपाण्यावर विकेंद्रीत पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी बोलताना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की,पाण्यावर पुनर्प्रक्रिया करणारा प्रकल्प लातुरात उभा राहिला याचे समाधान वाटते.सर्वच शहरांमध्ये अशा प्रकल्पांची आवश्यकता आहे.यामुळे प्रदूषणमुक्तीसह पाणीटंचाई कमी करण्यासही मदत होणार आहे.लातूर महानगरपालिकेने उभारलेला हा प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. लातूर पासून प्रेरणा घेऊन इतर शहरेही आता पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतील,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


लातूर शहर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, पाणीटंचाई कायमची दूर व्हावी यासाठी विविध पर्यायावर महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनात पालिकेच्या वतीने काम केले जात आहे. केवळ पाणी टंचाईच नाही तर शहराला स्वच्छ व सुंदर करण्यासाठीही महापौर विक्रांत गोजमगुंडे विविध उपक्रम राबवत आहेत . नाल्यातील पाण्याच्या माध्यमातून होणारे प्रदूषण टाळणे आणि पाण्याचा पुन्हा वापर करणे या हेतूने सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प महानगरपालिकेने हाती घेतले आहेत. शहराच्या विविध भागातून वाहून जाणाऱ्या सांडपाण्यावर महानगरपालिकेने विकेंद्रित पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. यात नाल्याचे पाणी अडवून या दूषित पाण्यावर वेगवेगळ्या माध्यमातून जैविक प्रक्रिया केली जाते.एका प्रकल्पातून प्रतिदिवशी 60 हजार लिटर शुद्ध पाण्याची उपलब्धता या माध्यमातून होते.अशा एकूण 8 प्रकल्पामुळे 4 लक्ष 80 हजार लिटर शुद्ध पाणी पुन्हा वापरात येणार आहे.पाणी शुद्धीकरण करताना निघालेल्या वेस्टेजचा खत म्हणून वापर करणे शक्य होणार आहे. लातूर मनपाने केवळ 25 लाखा मध्ये एका प्रकल्पाची उभारणी केली आहे. एकूण 8 प्रकल्पाकरिता २ कोटी चा निधी खर्च करण्यात आला आहे. अशा प्रकारचा एकमेव प्रकल्प महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी उभा करून राज्यापुढे आदर्श निर्माण केला आहे.


या कार्यक्रमास महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, पालिकेचे आयुक्त अमन मित्तल, विरोधी पक्षनेते ॲड.दीपक सूळ, सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे,नगरसेवक रविशंकर जाधव,अशोक गोविंदपूरकर, आयुब मनियार, अहमद खान पठाण, सचिन बंडापल्ले, युनूस मोमीन, नागसेन कामेगावकर, दत्ता सोमवंशी, मनपा पर्यावरण सल्लागार राहुल बोबे, मांजरा महाविद्यालयाचे डॉ आनंद पवार यांच्यासह मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

Recent Posts