महाराष्ट्र खाकी (गडचिरोली) – गडचिरोली जिल्ह्यातील पैडी जंगल परिसरात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत कसनसुर दलमच्या 13 जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले. या उल्लेखनीय कारवाईबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोली पोलीसांचे कौतुक केले आहे.सध्या गडचिरोली भागात तेंदुपत्ता गोळा करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालते. याच्या व्यापारातून नक्षलवादी मोठ्या प्रमाणावर खंडणी गोळा करतात. यासंदर्भात नक्षलवाद्यांची एक बैठक पैदी जंगलात होणार असल्याची माहिती C-60 पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने जंगलात सर्च ऑपरेशन सुरु केले.पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या नेतृत्वाखाली C-60 पथकाने जीवाची बाजी लावून हे ऑपरेशन पार पाडले. पोलिसांचा शरण येण्याचा सल्ला धुडकावून लावत नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. दीड तास चाललेल्या या चकमकीत 6 पुरुष आणि 7 महिला नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
या कारवाईत एके 47, एसएलआर, कारबॉईन, 303, 12 बोअर इत्यादी रायफल, भरपुर प्रमाणात स्फोटके तसेच नक्षलवादी दैनंदिन जीवनात वापरत असलेले साहित्य सापडले आहे. या कामगिरीबद्दल C- 60 पथकाचे गृहमंत्र्यांनी कौतुक केले. त्यांच्या शौर्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाची मान उंचावली आहे. त्यांच्या धाडसीपूर्ण कारवाईला सलाम, अशी भावना गृहमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.तसेच, गडचिरोली जवळील छत्तीसगड सीमेवरील नक्षलवादासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून, त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून सीमाभागात नक्षल प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.