महाराष्ट्र खाकी (जळगाव) – पोलीस नाईक विनोद अहिरे यांनी 2020 मध्ये एप्रिल महिन्यापासून जळगाव येथील कोरोना संसर्गजन्य कक्षात सलग सात महिने गार्ड ड्युटीचे कर्तव्य पार पाडले होते. 2020 च्या एप्रिलमध्ये कोरोनाची समाजामध्ये प्रचंड भीती होती त्याला पोलीसही अपवाद नव्हते अशा परिस्थितीत कोरोणा कक्षात तर सोडाच परंतु त्याच्या आसपास देखील ड्युटी करण्यासाठी कोणी धजावत नव्हते अशा परिस्थितीत जळगाव पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांनी कोरोना संसर्ग कक्षात सलग सात महिने अत्यंत निर्भीडपणे कर्तव्य पार पाडले. नुसतेच पार पाडले नाही तर, कोरोणाबद्दल समाज माध्यमांवर प्रबोधनात्मक अनेक लेख लिहून समाज जागृती केली. तसेच “मृत्यू घराचा पहारा” हे पुस्तक लिहून पोलीस, डॉक्टरासह कोरोना योद्ध्यांच्या वेदना समाजासमोर मांडल्या. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री कोविड सहायता निधी मध्ये आपले एक महिन्याचे वेतन देखील दिलेले आहे.त्यांचे पुस्तक केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे निकटवर्तीय रियाज सय्यद यांच्या वाचनात आले. त्यांनी तात्काळ तत्कालीन पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन त्यांना सदरचे पुस्तक भेट दिले असता पोलीस महासंचालकांनी देखील फोन करून त्यांचे कौतुक केले होते.
त्यानंतर नितीन गडकरी यांच्या वाचनात सदरचे पुस्तक आले त्यांनी देखील अहिरे यांना फोन करून कौतुक केले आणि तात्काळ रियाज सय्यद यांच्या हाती प्रशंसापत्र देखील पाठवले नितीन गडकरी आपल्या प्रशंसा पत्रात म्हणतात की कोरोना काळात विविध ठिकाणी ड्युटी करणाऱ्या पोलिसांचे प्रातिनिधिक अनुभवाचे कथन मला आपल्या “मृत्यू घराचा पहारा” या पुस्तकातून अनुभवता आले सन 2020 मध्ये महाराष्ट्रात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांएवढेच महत्त्वाचे काम आमच्या पोलीस बंधू-भगिनींनी केलेले आहे. त्या दरम्यान सर्वांना आलेले अनुभव अनेकदा अंगावर काटा आणणारे आहेत. विनोद अहिरे यांनी अत्यंत शैलीदार भाषेत हे वास्तव “मृत्यू घराचा पहारा” या पुस्तकातून मांडले आहे. एरवी पोलीस खाते रुक्ष समजले जाते; परंतु तो समज खरा नाही याची खात्री आपल्या पुस्तकातून पटते.कोरोनाच्या काळात समाजातील पोलिसांसह इतर घटकांचे योगदान आणि बलिदान तसेच पोलिसांचे सेवाव्रत देशभक्ती संवेदनशीलता या गोष्टीची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी घेतली जाईल. महाराष्ट्र आपण पोलीस दलाचे गौरव आहात आपल्या सेवाभिमुख जीवनासाठी आणि भविष्यातील लेखन-प्रपंचा त्यासाठी मनापासून शुभेच्छा…या शब्दात नितीन गडकरी यांनी विनोद अहिरे यांचे कौतुक केलेले आहे.