महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – महाराष्ट्रातील मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले सतीश चव्हाण यांना यंदा पदवीधरांनीच घरचा रस्ता दाखवणार, असे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे. मागील कार्यकाळात पदवीधर मतदारांच्या मतांवर निवडून आल्यानंतर त्यांच्या समस्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करणाऱ्या या नेत्याला आता पदवीधर मतदारांनीच घरी बसवण्याची तयारी केली आहे. पदवीधर मतदारसंघातून निवडून येणे म्हणजे फक्त मतं घेणे आणि नंतर गायब होणे, असाच अनुभव मागील पाच वर्षांत पदवीधरांना आला. सतीश चव्हाण यांनी अधिवेशनात पदवीधरांच्या मुद्द्यांवर किती प्रश्न विचारले? किती लावून धरले? याचे उत्तर शून्यवत आहे. पदवीधर बेरोजगारी, एमपीएससी पेपर फुटीसारख्या गंभीर प्रकरणांवर निवडणूक लक्षात घेऊन तोलून-मापून बोलण्याची त्यांची सवय आता मतदारांना चांगलीच कळली आहे. मतदारांना भेटायला वेळ नाही, समस्या ऐकायला वेळ नाही, पण मत मागायला मात्र पुन्हा येणे, हीच त्यांची कार्यपद्धती राहिली.
पदवीधर मतदारांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, “आमची फक्त मतदानाच्या वेळी आठवण होते. आमदार झाल्यानंतर आमच्या समस्या विसरून जायच्या आणि आम्हाला साध भेटायलाही वेळ काढायचा नाही, अशीच व्यवस्था सतीश चव्हाण यांनी केली.” मागील कार्यकाळातील हा कटू अनुभव आता पदवीधरांना पुन्हा त्याच व्यक्तीला पाठवण्यास तयार नाही. महायुतीच्या उमेदवारीमुळे काहींना वाटत असेल की सतीश चव्हाण सहज निवडून येतील. पण पदवीधर मतदारसंघ हा सामान्य मतदारसंघ नाही. इथे शिक्षित, जागरूक आणि समस्यांची जाणीव असलेले मतदार आहेत. त्यांना फक्त राजकीय व्यवस्थापनाने नाही, तर कामगिरीने जिंकावे लागते. आणि सतीश चव्हाण यांच्या मागील कामगिरीवरून ते स्पष्ट आहे की, त्यांनी पदवीधरांना फक्त मतपेटी म्हणून वापरले.
आता पदवीधर मतदार संघटित होत आहेत. ते स्पष्ट सांगत आहेत की, “या वेळेस आम्ही सतीश चव्हाण यांना विधानपरिषदेत पाठवणार नाही. आमदार होण्यासाठी पदवीधरांची गरज असते, पण आमदार झाल्यानंतर पदवीधरांची गरज नसते, असा अनुभव आम्ही घेतला आहे. आता त्यांना घरचा रस्ता दाखवणार.” सतीश चव्हाण यांना यंदा पदवीधर मतदारांचा तीव्र विरोध सहन करावा लागणार आहे. महायुतीची उमेदवारी ही फक्त एक कागदी तिकीट आहे; प्रत्यक्षात पदवीधरांचे मन जिंकण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नाही. मागील कार्यकाळातील दुर्लक्ष, प्रश्न न विचारणे, भेटी न देणे आणि निवडणुकीच्या तोंडावर तोलून बोलणे – या सर्व गोष्टी आता त्यांच्या विरोधात जात आहेत. पदवीधर मतदारसंघात यंदा सतीश चव्हाण यांचा पराभव निश्चित दिसत आहे! पदवीधरांनीच निर्णय घेतला आहे – या वेळेस आमदार सतीश चव्हाण नाही!




