Home » पोलीस » ACB NEWS BJP चा नगरसेवक १ लाख २० हजारांची लाच घेताना ACB ने केली अटक, ​जिल्हा नियोजन समितीकडून कामे मंजूर करून देण्याच्या नावाखाली ३ लाखांची मागितली होती लाच

ACB NEWS BJP चा नगरसेवक १ लाख २० हजारांची लाच घेताना ACB ने केली अटक, ​जिल्हा नियोजन समितीकडून कामे मंजूर करून देण्याच्या नावाखाली ३ लाखांची मागितली होती लाच

महाराष्ट्र खाकी (गडचिरोली / विवेक जगताप ) कंत्राटदाराकडून कामांचे बिल मंजूर करून देण्यासाठी चक्क १५ टक्के कमिशन (लाच) उकळणाऱ्या अहेरी नगरपंचायतीच्या एका भ्रष्ट नगरसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या धाडसी कारवाईमुळे भ्रष्ट लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून अहेरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

​अमोल विलासराव गुंडेलीवार (वय ४०, रा. प्रभाग क्र. ९, राजे विश्वेश्वरराव महाराज चौक, अहेरी) असे लाचखोर नगरसेवकाचे नाव आहे. तक्रारदार इलेक्ट्रिकल ठेकेदाराने अहेरी नगरपंचायत हद्दीत नागलोन योजना सन २०२५-२६ अंतर्गत अतिरिक्त सर्व्हिस केबल टाकण्याचे काम विहित मुदतीत पूर्ण केले होते. या कामांचे बिलही अदा झाले होते. मात्र, नगरसेवक अमोल गुंडेलीवार याने “ही कामे मी स्वतः जिल्हा नियोजन समिती, गडचिरोली येथून मंजूर करून आणली आहेत” असे सांगून एकूण बिलाच्या १५ टक्के म्हणजेच ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. ​तक्रारदाराने सुरुवातीला ५ ऑगस्ट २०२६ रोजी ३० हजार रुपये रोख दिले होते. परंतु, उर्वरित २ लाख ७० हजार रुपयांसाठी नगरसेवकाने तगादा लावल्याने वैतागलेल्या तक्रारदाराने थेट ‘लाचलुचपत प्रतिबंधक विभाग’ (गोंदिया) कडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.

​तक्रारीची पडताळणी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपी अमोल गुंडेलीवार याने आपल्या हार्डवेअरच्या दुकानात (श्रीराम ट्रेडर्स, बस स्टॉप रोड, अहेरी) तक्रारदाराकडे २,७०,००० रुपयांची मागणी केली व सध्या उपलब्ध असलेले १,२०,००० रुपये तात्काळ आणून देण्यास सांगितले. ​त्यानुसार (ACB) एसीबीच्या पथकाने श्रीराम ट्रेडर्स दुकानात सापळा रचला. तक्रारदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने अमोल गुंडेलीवार याला रंगेहात ताब्यात घेतले.

​आरोपी नगरसेवकाविरुद्ध अहेरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (संशोधन २०१८) चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून (अप क्र. ३६८/२०२६) त्याला १५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री २३:४८ वाजता रंगेहात अटक करण्यात आली. ​ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली/गोंदियाचे पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी, पोलीस निरीक्षक किरण बगाटे आणि त्यांच्या पथकाने केली.

Share This News

Related Post

National