महाराष्ट्र खाकी ( पुणे / विवेक जगताप ) -लाचखोर पोलिस हवालदार सतीश नाथाराव मुंढेचा थरारक कारनामा, ९५ हजारांची लाच स्वीकारून एसीबीच्या तावडीतून पैसे घेऊन पसार. गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि अटकेची कारवाई टाळण्यासाठी चक्क ९५ हजार रुपयांची लाच उकळणाऱ्या शिरूर पोलीस ठाण्यातील एका हवालदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकूनही तिथून पळ काढल्याचा धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सतीश नाथाराव मुंढे (वय ४५ वर्ष) असे या पसार झालेल्या लाचखोर पोलिसाचे नाव आहे.
शिरूर पोलीस ठाण्यात एका ५९ वर्षीय व्यक्तीविरोधात व त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सतीश मुंढे याच्याकडे होता. तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना या प्रकरणात अटक न करण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी मुंढे याने १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने ३० सप्टेंबर २०२६ रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली.
एसीबीने ३० सप्टेंबर रोजी केलेल्या पडताळणीदरम्यान हवालदार मुंढे याने १ लाख रुपयांवरून तडजोड करत स्वतःसाठी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने ९५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार टाकळी हाजी पोलीस चौकी येथे सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान पंचांसमक्ष हवालदार सतीश मुंढे याने तक्रारदाराकडून ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. मात्र, लाच स्विकारताच त्याला एसीबीच्या सापळा पथकाची चाहूल लागली. पकडले जाण्याच्या भीतीने मुंढे याने स्विकारलेली ९५ हजार रुपयांची लाचेची रक्कम सोबत घेतली आणि अंधाराचा फायदा घेऊन तो तिथून पसार झाला.
याप्रकरणी सतीश मुंढे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम ७ आणि बीएनएस कलम २३८ अन्वये शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई पर्यवेक्षण अधिकारी – पोलीस उप अधीक्षक सतीश वाळके व सापळा अधिकारी – पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोलीस हवालदार प्रवीण तावरे, पोलीस शिपाई बाळासाहेब गदादे आणि चालक पोलीस अभंग ऋषिकेश या पथकाने सहभाग घेतला.




