महाराष्ट्र खाकी (निलंगा / विवेक जगताप) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात एकीकडे राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांची स्वतःभोवती प्रसिद्धी झोत खेचण्यासाठी चाललेली चढाओढ चर्चेचा विषय ठरली. मुख्यमंत्र्यांच्या जवळ राहून फोटो किंवा व्हिडिओमध्ये चमकण्यासाठी अनेकजण धडपडत होते. मात्र, या गर्दीत सर्वसामान्यांना आणि मुख्यत्वे शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांपासून दूर ठेवण्याचा प्रकारही पाहायला मिळाला. परंतु, या संपूर्ण धामधुमीत एक अशी घटना घडली, जिने राजकारणातील मानवी मूल्यांचे आणि संवेदनशीलतेचे एक सुंदर दर्शन घडवले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमधून याचे वास्तव समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांनाही ही कृती निश्चितच भावली असावी, म्हणूनच त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काय घडले नेमके त्या व्हिडिओमध्ये?
मुख्यमंत्री फडणवीस शेतीच्या पाहणीसाठी आले असताना, ते चालत-चालत थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. त्यांच्या चालण्याचा वेग जास्त असल्याने त्यांच्यासोबत चालणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्याची दमछाक होत होती आणि तो मागे पडत होता. हे लक्षात येताच बाजूला असलेले निलंग्याचे आमदार तथा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढाकार घेतला. आमदार निलंगेकरांनी त्या वृद्ध शेतकऱ्याचा हात धरला, त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बाजूला चालण्यासाठी जागा करून दिली आणि स्वतः त्याच्यासोबत चालत राहिले. त्या वृद्ध शेतकऱ्याचे शेतीविषयक म्हणणे, त्याचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांसमोर पूर्ण होईपर्यंत आमदार निलंगेकरांनी त्या शेतकऱ्याचा हात सोडला नाही.
आजच्या राजकारणात जिथे केवळ प्रसिद्धी आणि झगमगाटाची स्पर्धा पाहायला मिळते, तिथे संभाजी पाटील निलंगेकरांची ही कृती लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या नात्यातील ‘मूळ भावना’ नेमकी कशी असावी, याची साक्ष देणारी ठरली. सत्तेत किंवा पदावर असतानाही सामान्यांच्या वेदनेशी आणि आवाजाशी जोडलेली संवेदनशीलता कशी जपली पाहिजे, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात भलेही इतरांनी कॅमेऱ्यात येण्यासाठी धडपड केली असेल, पण आमदार निलंगेकरांनी मात्र प्रसिद्धीच्या झोतापेक्षा एका सर्वसामान्य वृद्ध शेतकऱ्याच्या आत्मसन्मानाला आणि त्याच्या व्यथेशी न्याय मिळवून देण्याला प्राधान्य दिले. या एका लहानशा कृतीने केवळ त्या वृद्ध शेतकऱ्याचे मन जिंकले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसमोर राजकारणातील माणुसकीचे एक आश्वासक चित्र उभे केले आहे.




