Home » पोलीस » दीड कोटींच्या कामाचे बिल काढण्यासाठी १० लाखांची लाच मागणाऱ्या सहायक अभियंता विनोद मकरध्वज नवघरे ला २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अँटी करप्शन पकडले

दीड कोटींच्या कामाचे बिल काढण्यासाठी १० लाखांची लाच मागणाऱ्या सहायक अभियंता विनोद मकरध्वज नवघरे ला २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अँटी करप्शन पकडले

महाराष्ट्र खाकी (अमरावती / विवेक जगताप ) – शासकीय कामांचे देयक (बिल) काढण्यासाठी टक्केवारीची मागणी करणाऱ्या भ्रष्ट यंत्रणेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग, धारणी (जि. अमरावती) येथे कार्यरत असलेला **सहायक अभियंता विनोद मकरध्वज नवघरे (वय ३४) हा शासकीय अधिकारी चक्क २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात अडकला आहे. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात एकच खाडखळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे एक बांधकाम कॉन्ट्रॅक्टर व बिल्डींग मटेरियल सप्लायर असून, त्यांनी २०२४-२५ व २०२५-२६ या आर्थिक वर्षात सार्वजनिक बांधकाम उपविभाग, धारणी अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून धारणी तालुक्यातील विविध गावांमधील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम व साहित्य पुरवठ्याचे काम केले होते. तक्रारदाराचे अंदाजे दीड कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले असून, मार्च २०२६ मध्ये त्यांना या कामाचे देयक प्राप्त झाले होते. या संपूर्ण दीड कोटींच्या देयक काढ मोबदला म्हणून आणि उर्वरित ८० लाख रुपयांच्या प्रलंबित देयकापोटी आरोपी सहायक अभियंता विनोद नवघरे याने तब्बल ७ टक्के प्रमाणे १०,४०,०००/- (दहा लाख चाळीस हजार) रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), अमरावती घटकाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर १६ सप्टेंबर २०२६ रोजी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये आरोपी अभियंत्याने लाचेची रक्कम तडजोडीअंती ९ लाख रुपये घेण्याचे मान्य केले आणि त्यापैकी **पहिला हप्ता म्हणून २ लाख रुपये** लाच स्वीकारण्याचे ठरवले.

ठरलेल्या बेवारसाप्रमाणे १६ सप्टेंबर २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. पंचासमक्ष आरोपी सहायक अभियंता विनोद नवघरे याने तक्रारदाराकडून २ लाख रुपयांची लाच रक्कम त्याच्या **शासकीय निवासस्थानी**स्वतःसाठी स्वीकारली. त्याच क्षणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकून या भ्रष्ट अभियंत्याला बेड्या ठोकल्या आणि ताब्यात घेतले. सदर प्रकरणात पोलीस स्टेशन धारणी येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ही धडक कारवाई पोलीस उपअधीक्षक रमेश ताले (ला.प्र.वि. अमरावती घटक), पो.हवा. प्रमोद रायपूरे, पो.कॉ. वैभव जायले, चालक पो.कॉ. राजेश बहीरत यांच्या पथकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक बापू बांगर व अपर पोलीस अधीक्षक  सुनिल किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

Share This News

Related Post

National