Home » पोलीस » लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना ‘लातूर भूषण’ पुरस्कार प्रदान, “हा पुरस्कार माझ्या संपूर्ण पोलीस दलाचा!” – पोलीस अधीक्षक अमोल तांबे

लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना ‘लातूर भूषण’ पुरस्कार प्रदान, “हा पुरस्कार माझ्या संपूर्ण पोलीस दलाचा!” – पोलीस अधीक्षक अमोल तांबे

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी, कायदा व सुव्यवस्था राखण्यातील तत्परता आणि अभिनव जनसंवाद उपक्रमांची दखल घेत, लातूर जिल्ह्याचे **पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांना मानाच्या ‘लातूर भूषण’  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (जिल्हा शाखा, लातूर) यांच्या वतीने दयानंद सभागृहात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पालकमंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेल्या या सन्मानामागे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी राबविलेले लोककल्याणकारी आणि समाजभिमुख उपक्रम प्रमुख ठरले.

पुरस्कारामागील उल्लेखनीय कामगिरी व उपक्रम
1) पोलीस विद्यार्थी संवाद (१ ऑगस्ट २०२६ पासून) –  शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, नवीन कायदे, सायबर गुन्हे आणि वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली.
2) पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर –  ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांच्या समस्या थेट त्यांच्या शेतात जाऊन ऐकून घेतल्या आणि तत्परतेने सोडवल्या.
3) पोलीस आपल्या सोसायटीमध्ये-  शहरी भागातील गृहनिर्माण सोसायट्यांना भेटी देऊन नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
4) हेल्मेटसक्ती जनजागृती मोहीम (१ सप्टेंबर २०२६ पासून) –  दुचाकीस्वारांचे प्राण वाचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात हेल्मेटच्या वापरावर विशेष भर देण्यात आला.

“हा पुरस्कार माझ्या संपूर्ण पोलीस दलाचा!” – अमोल तांबे
हा बहुमान स्वीकारताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी अत्यंत नम्रपणे याचे संपूर्ण श्रेय लातूर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना दिले. “हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून लातूर पोलीस दलातील प्रत्येक सहकाऱ्याच्या कष्टाचे फळ आहे,”असे सांगत त्यांनी जनतेशी जवळीक साधणाऱ्या नागरिककेंद्री पोलीसिंगवर आपला विश्वास पुन्हा अधोरेखित केला. या शानदार सोहळ्याला पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी डॉ. बाष्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्यासह अनेक मान्यवर आणि लातूरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लातूर पोलिसांच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share This News

Related Post

National