Home » प्रशासकीय » विकसित मराठवाड्यासाठी क्रीडा क्षेत्राला बळ; विभागीय क्रीडा संकुलात उच्च दर्जाच्या सुविधा आणि सुरक्षितता प्रदान करण्याचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे निर्देश

विकसित मराठवाड्यासाठी क्रीडा क्षेत्राला बळ; विभागीय क्रीडा संकुलात उच्च दर्जाच्या सुविधा आणि सुरक्षितता प्रदान करण्याचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे निर्देश

महाराष्ट्र खाकी ( छत्रपती संभाजीनगर / विवेक जगताप ) –  विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेतून  विकसित मराठवाडा घडविताना क्रीडा क्षेत्राला विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र बनविण्यासाठी आवश्यक त्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि कडक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तथा विभागीय क्रीडा संकुल समितीचे उपाध्यक्ष जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित विभागीय क्रीडा संकुल समितीच्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., विभागीय क्रीडा संकुलचे उपसंचालक तथा समितीचे सदस्य सचिव शेखर पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीतील ठळक मुद्दे व निर्देश
आधुनिक पायाभूत सुविधांवर भर:मुख्यमंत्री यांच्या विकसित महाराष्ट्र धोरणानुसार मराठवाड्यात उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा संकुलात आधुनिक व दर्जेदार सुविधा उभारण्यावर भर देण्यात येणार आहे.
सिंथेटिक ट्रॅकचे लोकार्पण – मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त विभागीय क्रीडा संकुलातील ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅकचे उद्घाटन होणार असून, याच कालावधीत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विविध प्रकल्पांची पूर्तता – ट्रॅकचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासह खालील कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या:
1) विभागीय निपुणता केंद्र
2) लॉन टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन आणि बॉक्सिंगसाठी इनडोअर हॉल
3) बास्केटबॉल व फुटबॉलसाठी दर्जेदार मैदाने
4) खेळाडूंसाठी उत्तम निवासी व्यवस्था व ‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत वसतिगृहांची दुरुस्ती
5) दर्जेदार क्रीडा साहित्य, रंगरंगोटी, विद्युत दुरुस्ती आणि स्वच्छतागृहांची सुधारणा

विशेष निधीसाठी प्रस्ताव- या सर्व विकासकामांसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे सांगण्यात आले.
खेळाडूंची सुरक्षा आणि शिस्त यावर विशेष भर
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त- खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने क्रीडा संकुल परिसर व आजूबाजूच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त  करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, परिसरात भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या व्यक्तींवर कडक  दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
पे अँड पार्क सुविधा – संकुलातील पार्किंगची सुविधा अद्यावत करण्यासाठी नियोजन करून, येणाऱ्या सर्व वाहनांसाठी योग्य शुल्क निश्चित करून **’पे अँड पार्क’** सुविधा सुरू करण्यात यावी.

प्रमाणित कार्य पद्धती (SOP) – नव्याने सुरू होणाऱ्या सिंथेटिक ट्रॅक व फुटबॉल मैदानाच्या वापरासाठी एक प्रमाणित कार्य पद्धती (SOP) तयार करण्यात यावी आणि या सुविधा फक्त खेळाडूंकरिता उपलब्ध राहतील, याची दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
विभागीय आयुक्तांच्या या दूरदर्शी आणि कठोर भूमिकेमुळे मराठवाड्यातील क्रीडा संस्कृतीला नवी दिशा मिळणार असून, खेळाडूंना हक्काचे आणि जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

Share This News

Related Post

National