महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात रस्ते अपघातांमुळे होणारे अनाठायी मृत्यू रोखण्यासाठी वाहतूक नियमांची जनजागृती ही गरजेची बाब आहे. चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्ट आणि दुचाकी चालविताना हेल्मेटचा अनिवार्य वापर केल्यास अपघाती मृत्यूंची संख्या नक्कीच घटेल, असे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता अलका डाके, एनआयसीचे पुरुषोत्तम रुक्मे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी सांगितले की, अपघातांची माहिती संकलन आणि त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी केंद्र शासनाने IRADI पोर्टल सुरू केले आहे. जिल्ह्यातील सर्व अपघातांची माहिती विहित वेळेत या पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी यावेळी सांगितले की, अपघाती मृत्यूंपैकी जवळपास ७० टक्के मृत्यू दुचाकी अपघातांमध्ये होतात. दुचाकी चालविताना हेल्मेट वापरल्यास हे मृत्यू रोखता येऊ शकतात. तसेच महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांवर गतिरोधक बसवण्याची आवश्यकता आहे.
बैठकीत वाहतूक नियमांचे कठोर पालन करण्याचे आवाहन सर्व उपस्थित अधिकाऱ्यांनी केले. नागरिकांनीही वाहन चालविताना सीट बेल्ट, हेल्मेटचा वापर करून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले.



