महाराष्ट्र खाकी (निलंगा / विवेक जगताप) – सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ची महत्त्वपूर्ण सभा आज निलंगा तहसील कार्यालयात मा. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. निलंगा मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेला अधिक मजबूत आणि नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत पावसाळ्यात वाढणाऱ्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले. मा. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी स्पष्ट सांगितले की, “जनतेच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही. सर्व आरोग्य केंद्रांनी औषधांचा पुरेसा साठा ठेवावा आणि रुग्णांना तत्परतेने सेवा द्यावी.”
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये आणि तालुका स्तरावरील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यावर भर देण्यात आला. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वयाने काम करून नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवेचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहनही आमदारांनी केले.
या बैठकीत निलंगा मतदारसंघातील आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे ठरले आहे.
जि.प. अध्यक्षा उषाताई पाटील, निलंगा तहसीलदार प्रसादजी कुलकर्णी, देवणी तहसीलदार सोमनाथजी वाडकर, शिरोळ अनंतपाळ तहसीलदार किशोरजी यादव, निलंगा आरोग्य अधिकारी प्रदिपकुमारजी जाधव, निलंगा गटविकास अधिकारी सतिषजी पाटील, शि.अनंतपाळ आरोग्य अधिकारी डॉ. नारायणजी देशमुख, शि.अनंतपाळ वैद्यकीय अधीक्षक अनंतजी पुरी, प्रा.आ. केंद्र येरोळ वैद्यकीय अधिकारी शुभमजी सांगडे, निलंगा नगराध्यक्ष संजयराजजी हलगरकर आदी.




