डॉ. गायत्री अनिलकुमार रामटेके यांना ‘लिजेंड दादासाहेब फाळके अवार्ड २०२६’ जाहीर, एकपात्री अभिनय क्षेत्रातील उज्ज्वल कामगिरीला मानाचा मुजरा

महाराष्ट्र खाकी (मुंबई / प्रतिनिधी) – एकपात्री नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून सामाजिक, ऐतिहासिक आणि स्त्री-सशक्तीकरणाचे प्रभावी दर्शन घडवणाऱ्या प्रख्यात अभिनेत्री डॉ. गायत्री अनिलकुमार रामटेके यांना ‘लिजेंड दादासाहेब फाळके अवार्ड २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कलात्मक योगदानाची दखल घेत त्यांना ‘दादासाहेब फाळके लाईफ टाइम अचीवमेंट अवार्ड’ प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. रामटेके यांनी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये आपल्या दमदार एकपात्री अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. “मी रमाई बोलते”, “मी सावित्रीबाई फुले बोलते” आणि “मी जिजाऊ बोलते” या त्यांच्या गाजलेल्या नाट्यप्रयोगांमधून त्यांनी स्त्रीशक्ती, सामाजिक न्याय आणि इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचे विचार प्रभावीपणे मांडले आहेत.

हा भव्य पुरस्कार सोहळा येत्या ४ मे रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून, त्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. कृष्णा चौहान यांनी अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा केली आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लातूर लोकसभेचे माजी खासदार, संसदरत्न प्रा. डॉ. ॲड. सुनील बळीराम गायकवाड यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची प्रतिष्ठा अधिक वाढणार आहे.

डॉ. गायत्री रामटेके यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या सन्मानामुळे एकपात्री नाट्यप्रकाराला नवे बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातून नवोदित कलाकारांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Recent Posts