महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत युवराजगिरी (महाराज) यांचा काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताने पोलीस दलातच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, अपघाताच्या वेळी त्यांच्या गाडीत लातूरमधील ‘मटका किंग’ म्हणून ओळखला जाणारा गोविंद पाटील उपस्थित होता, अशी चर्चा पोलीस व मटका क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंदाळा येथील कला केंद्रावरून लातूरकडे परत येत असताना हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेची चर्चा पोलीस वर्तुळात जोरात सुरू असून, यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, नुकतेच पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन लातूर जिल्ह्यात गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केल्याचा दावा केला होता. मात्र, त्या पत्रकार परिषदेच्या अवघ्या दोन-तीन दिवसांतच LCB मधील पोलीस कर्मचाऱ्याचा कथित ‘मटका किंग’सोबत प्रवास करताना अपघात झाल्याने या दाव्यांवर शंका उपस्थित केली जात आहे. पोलीस दलातील काहीजण व नागरिकांमध्ये अशीही चर्चा आहे की, जिल्हा खरोखर गुन्हेमुक्त आणि अवैध धंदेमुक्त करायचा असेल तर प्रथम पोलीस दलाचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या अपघाताची सखोल चौकशी करावी, अपघातावेळी गाडीत नेमके कोण होते, ते सिंदाळा कला केंद्रावरूनच येत होते का? , तसेच मद्यप्राशन झाले होते का? याचीही तपासणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणातील सत्य समोर आल्यास पोलीस दलातील शिस्त आणि विश्वासार्हता अधिक मजबूत होईल, तसेच अवैध धंद्यांशी संबंधित घटकांशी असलेले कथित संबंध उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








