करवाढ नाही, विकासाला गती — परळी नगरपरिषदेचा २९३ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी सादर

महाराष्ट्र खाकी ( परळी वैजनाथ / प्रतिनिधी ) – परळी नगरपरिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा २९३ कोटी ३० लाख ३३ हजार ७५३ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी सभागृहात सादर केला. कोणतीही करवाढ किंवा दरवाढ न करता विकासकामांना गती देणारा हा ‘विकासनामा’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरपरिषद निवडणुकीनंतर महायुतीच्या वतीने सादर करण्यात आलेला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे आणि माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुतीने शहराच्या चौफेर विकासाचा ध्यास घेतला असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. नगरपरिषदेच्या नव्या नियमक मंडळाकडून सादर झालेले हे पहिले अंदाजपत्रक असून, परळीकरांना दिलासा देणारे ‘करवाढमुक्त पण विकासयुक्त’ अंदाजपत्रक अशी त्याची वैशिष्ट्ये असल्याचे सांगण्यात आले.

मांडण्यात आलेल्या तपशीलानुसार, विविध कर व दर, विशेष अधिनियमांतर्गत वसुली, मालमत्ता उत्पन्न, अनुदाने, संकीर्ण उत्पन्न आणि मागील शिल्लक मिळून एकूण अपेक्षित उत्पन्न २९३.३० कोटी रुपये धरण्यात आले आहे. तर स्वच्छता विभाग, आरोग्य व पाणीपुरवठा, रस्त्यांवरील विद्युत व्यवस्था, भालचंद्र वाचनालय व इतर वाचनालये आदींसाठी एकूण नियोजित खर्च २९२ कोटी ९५ लाख १४ हजार ८२० रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे अंदाजे ३५ लाख १८ हजार ९३३ रुपयांची शिल्लक अपेक्षित आहे.

याशिवाय शासनाच्या विविध योजनांतून रस्ते, सभागृहे, नाली बांधकाम, ढापे, शासकीय इमारती तसेच नगरोत्थान, अल्पसंख्यांक आणि विशेष योजनांअंतर्गत दुरुस्ती व विकासकामांसाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, शहर विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला असून स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते, दिवाबत्ती व्यवस्था आणि उत्तम आरोग्य या पंचसूत्रीवर आधारित नियोजन करण्यात आले आहे. “स्वच्छ-सुंदर-हरित परळी” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा मानस नगरपरिषदेकडून व्यक्त करण्यात आला.

नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिलाच अर्थसंकल्प सादर करताना, नगरपालिकेच्या प्रत्येक रुपयाचा विनियोग जनकल्याणासाठी करण्याचा निर्धार व्यक्त केला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी राजकारणापलीकडे जाऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी सभागृहात केले. सर्वांच्या सहकार्याने परळी नगरपरिषद अधिक सक्षम, समृद्ध व महाराष्ट्रात अव्वल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेला उपनगराध्यक्ष, सर्व समित्यांचे सभापती तसेच नगरपरिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent Posts