महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – प्रभाग क्र. १४ च्या सर्वांगीण विकासासाठी आणि तेथील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सदैव तत्पर व अग्रेसर असलेले नगरसेवक रविशंकर जाधव यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले. प्रभाग १४ मधील गौतम नगर (खणी) येथील नागरिकांचा तब्बल ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेला ‘कबाला’ प्रश्न अखेर मार्गी लागला आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू तरळले.
हा प्रश्न गेल्या १५ वर्षांपासून नगरसेवक रविशंकर जाधव यांनी चिकाटीने लावून धरला होता. सातत्यपूर्ण पाठपुरावा, प्रशासनाशी समन्वय आणि लोकहिताची ठाम भूमिका यामुळेच हा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवण्याची वाट मोकळी झाली. राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावणकुळे साहेब यांनी काही क्षणांत निर्णय घेऊन हा प्रश्न निकाली काढला आणि नागरिकांना मोठा दिलासा दिला.
विशेष म्हणजे, अनेक वर्षांपासून रखडलेले कबाले कोणतेही शुल्क न भरता मिळणार असल्याचे स्पष्ट होताच परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव उमटले. “भारतीय जनता पार्टीचे नेते केवळ बोलत नाहीत, ते करून दाखवतात,” याचा अनुभव प्रभागातील जनतेला प्रत्यक्ष आला.
या ऐतिहासिक निर्णयामागे आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार आणि अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रयत्नांचा मोलाचा वाटा आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातूनच हा दीर्घकालीन प्रश्न सुटू शकला, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
“रविशंकर जाधव यांच्या नेतृत्वामुळेच कबाला प्रश्न मार्गी लागला,” असे म्हणत प्रभागातील नागरिकांनी आगामी निवडणुकीत त्यांना ठाम पाठबळ देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपवणारा हा निर्णय गौतम नगरच्या इतिहासात आशा, विश्वास आणि विकासाचा नवा अध्याय लिहिणारा ठरला आहे.




