महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – लातूरच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या कार्याचा मागोवा घेणाऱ्या “लातूरचा विकासपुरुष : दिलीपराव देशमुख” या ग्रंथाचे प्रकाशन आज त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ‘आशियाना’ निवासस्थानी त्यांच्याच हस्ते संपन्न झाले. या ग्रंथाचे लेखन लातूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे माजी खासदार,
संसदरत्न, डॉक्टर, अॅडव्होकेट, प्राध्यापक डॉ. सुनील वत्सला बळिराम गायकवाड यांनी केले असून, या ग्रंथात दिलीपराव देशमुख यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि औद्योगिक कार्याचा विस्तृत आढावा घेण्यात आलेला आहे. हा ग्रंथ नवे नेतृत्व, अभ्यासक आणि लोकप्रतिनिधींकरिता एक मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रकाशनप्रसंगी अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि
हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वतः ग्रंथलेखक डॉ. सुनील वत्सला बळिराम गायकवाड यांचीही विशेष उपस्थिती लाभली होती. हा ग्रंथ म्हणजे दिलीपराव देशमुख यांच्या प्रेरणादायी कार्याचा दस्तऐवज असून, लातूरच्या विकास प्रवासाचा साक्षीदार आहे.
