महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – चालू आर्थिक वर्ष संपत आले तरी अद्यापही लातूर शहरातील अनेकांनी मालमत्ता करा भरला नसल्याचे समोर आले . लातूर शहर महापालिकेने विविध सवलती देऊनही कर भरण्याकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. अशा कर चुकव्या थकबाकीदारांची यादी जाहीर करण्याचा निर्णय महापालिका
प्रशासनाने घेतला आहे. लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी नागरिकांनी 20 मार्चपूर्वीच कराचा भरणा करावा असे आवाहन केले आहे , अन्यथा थकबाकीदार यादीत नाव प्रसिध्द होणार आहे. मार्च महिना सुरू झाला तरी काही थकबाकीदार कर भरण्यास तयार नसल्याने जप्तीसोबतच मालमत्ताधारकांची नावे
प्रसिद्ध करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार 21 मार्चपासून थकबाकीदारांची नावे संकेतस्थळासोबतच वर्तमानपत्र व बॅनरद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहेत. ही नामुष्की टाळण्यासाठी थकबाकीदारांनी कराचा भरणा 20 मार्चपूर्वीच करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी केले आहे.
