महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – लातूर जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेच्या कामांना गती देण्याबाबत वारंवार सूचना देवूनही काही कामे अद्यापही अपेक्षित गतीने होत नसल्याचे दिसून येत आहे. या कामांना गती देण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा
ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. पाणी टंचाई उपाययोजना आणि जल जीवन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, उप अभियंता यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे यांची यावेळी उपस्थिती होती. जल जीवन मिशनच्या विहिरी, बांधकामे यासारखी कामे पावसाळ्यापूर्वी होणे
आवश्यक आहे. तसेच ज्या गावातील योजनेचे किरकोळ काम शिल्लक आहे, अशी कामे येत्या सात दिवसाच्या आत पूर्ण करावीत. जागेची अथवा इतर अडचणीमुळे कामांमध्ये दिरंगाई होत असल्यास तहसीलदार, गट विकास अधिकारी, संबंधित उप अभियंता, ग्रामसेवक यांनी समन्वयातून याविषयी तोडगा काढावा. तसेच
अद्यापही अपेक्षित प्रगती नसलेल्या कामांना गती देवून ही कामे लवकरात लवकर पूर्ण होतील, यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. तसेच यापुढे या योजनेचा दैनंदिन आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी टंचाईच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने कार्यवाही जलदगतीने होण्यासाठी उपविभागीय महसूल
अधिकारी, तहसीलदार यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे याबाबतचे कोणतेही प्रस्ताव प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी दिल्या. तसेच प्रत्येक तालुकानिहाय उपाययोजनांचा आढावा घेतला. जल जीवन मिशनची काम तातडीने पूर्ण करण्यासाठी यापूर्वी देण्यात
आलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या योजनेच्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा आणल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येईल. गट विकास अधिकारी यांनी याबाबत अहवाल सादर करावेत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले. तसेच पाणी टंचाईच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला.