महाराष्ट्र खाकी ( विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्याचे सुपुत्र भाजपचे नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या तत्पर सेवेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. व्यवसायाने सर्जन असलेल्या डॉ. भागवत कराड यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्ली ते मुंबई असा प्रवास करतेवेळी विमानातील एका प्रवाशाचे प्राण वाचवले होती. त्यांनी विमानाच्या आपत्कालीन किटमध्ये उपस्थित प्रवाशाला इंजेक्शन दिले होते.
त्यानंतर आता बेशुद्ध पडलेल्या एका फोटोग्राफरला नवसंजीवनी दिली आहे. एका कार्यक्रमादरम्यान एक फोटोग्राफर बेशुद्ध पडला. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी डॉ. भागवत कराड यांनी तातडीने या फोटोग्राफरला आरोग्यविषयक सहकार्य केले. डॉ. भागवत कराड हे दिल्लीतील ताज मानसिंग येथे मुलाखत देत होते.
ही चर्चा कव्हर करण्यासाठी आलेला एक फोटोग्राफर बेशुद्ध पडला आणि त्याच्या नाडीचे ठोके लक्षणीयरीत्या खालावले. हे पाहून डॉ. भागवत कराड यांनी तातडीने मदत सुरू केली आणि नाडी तपासली. यानंतर त्यांनी पल्स रेट वाढवण्यासाठी फोटोग्राफरचे पंजे दाबण्यास सुरुवात केली. सुमारे 7-8 मिनिटांनी फोटोग्राफरची प्रकृती सुधारू लागली. यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी ग्लुकोजची पातळी
वाढवण्यासाठी मिठाई खाऊ घातली. हे प्रकरण समोर आल्यानंतर डॉ. भागवत कराड यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. योगगुरू स्वामी रामदेव यांनीही डॉ. भागवत कराड यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.