महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – भारताचे भविष्य उज्वल करण्यासाठी भावी पिढी घडविण्याचे काम महिलांच्या माध्यमातून होते. त्यामुळेच महिला व तरूणींना सक्षम आणि निरोगी करणे या आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळेच तरूणी व महिलांच्या आरोग्यविषयी असणा-या समस्यांबाबत जनजागृती करून त्यांचे निराकरण करण्यासाठी अक्का फाउंडेशनने पुढाकार
घेतलेला आहे. अक्का फाउंडेशनच्या 6 व्या वर्धापन दिनाचे व माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी पालकमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून प्रोजेक्ट आनंदी राबविण्यात येणार आहे. या प्रोजेक्टचा शुभारंभ दि. 4 जून 2022 रोजी करण्यात येणार असुन या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वेक्षण आणि जागरूकता, वितरण आणि नियोजन व
स्वयंपूर्णता या तीन टप्प्यात हा उपक्रम राबवला जाणार आहे. मासिक पाळी संदर्भात समाजात असणारे गैरसमज, अंधश्रद्धा व अशुद्धपणाची भावना दूर करणे, किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी विषयी जागृती निर्माण करून निगा राखण्याची माहिती देणे, सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे, बचत गटामार्फत सॅनिटरी पॅडचे उत्पादन करून रोजगार उपलब्ध करणे, या अभियानात पुरुषांचा
सहभाग वाढवणे, आगामी तीन वर्षात मासिक पाळी व आरोग्य विषयी जागरूक जिल्हा अशी लातूरची ओळख करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. मासिक पाळी संदर्भात जुन्या रूढी-परंपरा अंगिकारल्या जात असल्याने मुलींचा आत्मविश्वास कमी होणे, शिक्षण अर्धवट सोडणे अशा सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. याशिवाय मूत्राशयाचा संसर्ग, फंगल इन्फेक्शन,
मुत्रमार्गाचा संसर्ग, गर्भाशय मुखाचा कर्करोग आदी आजार आहेत. त्यापासून किशोरवयीन मुलींची सुटका करणे यासाठी माजी पालकमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी पुढाकार घेतला आहे. सर्वेक्षण व जागरुकता, वितरण आणि नियोजन व स्वयंपूर्णता अशा तीन टप्प्यात जिल्ह्यात हा उपक्रम राबवला जाणार आहे.पहिल्या टप्प्यात निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा,
देवणी व शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्यातील 25 हजार किशोरवयीन मुलींना माजी पालकमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मासिक मानधनातून सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.या अभियानात पुरुषांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या प्रोजेक्टचा शुभारंभ दि. 4 जून 2022 रोजी करण्यात येणार असुन या प्रोजेक्टच्या यशस्वीतेसाठी
सामाजिक संस्थासह जिल्हयातील डॉक्टर्स व शैक्षणीक संस्थांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन अक्का फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.