महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर शहरात मागच्या एक महिन्या पासून पिवळसर तपकीरी पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी आहेत. पाण्याला पिवळसर रंग येण्या मागच्या कारणांचा शोध घेऊन तो रंग घालवण्यासाठी महापालीका पदाधिकारी आणि प्रशासन प्रयत्न करीत आहेत. शेती सिंचनासाठी कॅनलव्दारे पाणी सोडल्या नंतर धरणातील पाणी उचमळून शेवाळे वरच्या
बाजूस येत आहे. हे शेवाळे कडक उन्हाच्या संपर्कात आल्या नंतर तेथे रासायनीक प्रक्रीया होवून पिवळसर तपकीरी रंग पाण्यात मिसळत आहे. पुरवठा होणाऱ्या पाण्याचा पिवळसर, तपकीरी रंग घालवून तो सामान्य करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरून आता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रीकी अनुसंधान संस्थेचे
(नीर) एक पथक लातूरला येणार आहे. पाण्याची तपासणी केले नंतर या संदर्भात ते उपाययोजना सुचवीणार आहेत
शुध्दीकरणाची प्रक्रीया पूर्ण झाले नंतरही रासायनीक प्रक्रीयेतून पाण्याला आलेला पिवळसर तपकीरी रंग कायम राहत आहे. सदरील पाणी पिण्यास योग्य असले तरी पिवळसर तपकीरी रंगामुळे नागरीकात भितीचे वातावरण आहे. सातत्याने प्रयोग आणि प्रयत्न करूनही पाण्याला
आलेला रंग दूर करण्यात यंत्रणेला यश येताना दिसत नाही. या संदर्भाने लातूर जिल्हाधिकारी यांनी केलेल्या विनंती नंतर पालकमंत्री अमित देशमुख यांनी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रीकी अनुसंधान संस्थेस सुचीत केले असून सदरील संस्थेने लवकरच लातूरला या संदर्भाने पथक पाठवण्यात येत असल्याचे सांगितले आहे. हे पथक पाण्याची तपासणी करून उपाययोजना सुचवणार आहे.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रीकी अनुसंधान संस्था (नीर) पर्यावरण, विज्ञान आणि अभियांत्रीकी क्षेत्रातील देश पातळीवरील संस्था आहे. या संस्थेच्या देशभरात विविध ठिकाणी प्रयोगशाळा असून संस्थेचे मुख्य कार्यालय नागपूर येथे आहे. पाण्याचे शुध्दीकरणात या संस्थेचे मोठे कार्य आहे.