महाराष्ट्र खाकी ( उदगीर / प्रशांत साळुंके ) – लोकनेते विलासराव देशमुख सभागृह,उदगीर प्रसार माध्यमांची विश्वासार्हता शून्यावर येऊन ठेपलेली नाही, ती टिकवण्याची जबाबदारी केवळ संपादक आणि पत्रकार यांची नसून वाचक-प्रेक्षक यांच्यासह मालकांची देखील आहे. जे खपतं तेच विकलं जातं या न्यायाने ज्याला सर्वाधिक वाचक अथवा प्रेक्षकवर्ग मिळतो अशाच बातम्या
द्याव्या लागतात, असा सूर व्यक्त करण्यात आला. उदगीर येथे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात “प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता शून्यावर येऊन ठेपली आहे!” या परिसंवादाचे आयोजन आजकरण्यात आले होते. लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात हुतात्मा भाई श्यामलालजी व्यासपीठावर आयोजित परिसंवादाच्या
अध्यक्षस्थानी माध्यम विश्लेषक प्रा. जयदेव डोळे होते. श्रीपाद अपराजित, जयप्रकाश दगडे, प्रा. धनंजय भिसे, नम्रता वागळे, अरुण समुद्रे, प्रदीप नणंदकर, प्रा. डॉ. दत्ता होनराव हे परिसंवादात सहभागी झाले होते. शेतकरी आत्महत्यासारख्या प्रश्नांवर माध्यमांनी आवाज उठवला. जर ‘स्क्रिप्टेड शो’ असेल तर त्याची विश्वासार्हता धोक्यात येतेच. विवेकाला शाबूत ठेवणे गरजेचे आहे. पत्रकारांनी
जनतेचे वकील व्हावे न्यायाधीश होऊ नये, आक्रस्ताळेपणा हे वक्तृत्व नाही तर शिवराळपणा आहे; नेतृत्व नाही. पत्रकारितेला डावलून चालणार नाही, असे मत नागपूरचे श्रीपाद अपराजित यांनी व्यक्त केले. पॅकेजमध्ये पत्रकारिता गुदमरते म्हणून विश्वासार्हता धोक्यात आली आहे. विश्वासार्हता टिकवण्यासाठी आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. सत्याची उपासना करणारा दु:खी आहे तर
लक्ष्मीची उपासना करणारा सुखी आहे. मात्र अशा ठिकाणी विनाश जडलेला आहे. ही विश्वासार्हता संपूर्ण संपली नाही अद्यापही मुद्रित माध्यमे विश्वासार्हता टिकवून आहेत. या माध्यमांवर सुमारे 62 टक्के विश्वास सर्वेक्षणाच्या माध्यमातून दर्शविण्यात आला आहे, असे मत जयप्रकाश दगडे यांनी व्यक्त केले. या व्यासपीठावर मी वाचकांचा प्रतिनिधी म्हणून बोलत असल्याचे मत प्रा.
धनंजय भिसे यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यपूर्वकाळात ध्येयवाद होता. त्यावेळी वृत्तपत्रे ही मतपत्रे होती; मात्र स्वातंत्र्योत्तर काळानंतर यात बदल झाला. सगळेच पत्रकार विकाऊ नाहीत, त्यांच्यावर अंकुश असल्यामुळे ते गप्प आहेत. पत्रकारांच्या योग्य भूमिकेला वाचकांनी देखील पाठिंबा देणे गरजेचे आहे. सामाजिक न्याय मांडण्यासाठी प्रसारमाध्यमांनी भूमिका घ्यावी, असे मत प्रा. धनंजय
भिसे यांनी व्यक्त केले. इलेक्ट्रॉनिक मीडियात सगळी टीआरपीची गणितं असतात. त्याची परिभाषा वेगळी असते, जे प्रेक्षकांना बघायला आवडते ते दाखविले जाते. रिकाम्या पोटी समाजकार्य करता येत नाही आणि समाज कार्य करावे असा समाज देखील उरला नाही. आम्ही थेट प्रश्न विचारतो आणि थेट उत्तरे मागतो. सोशल मीडियाच्या काळात कोणीही पत्रकार होतो. त्यास विश्वासार्हता
असतेच असे नाही. प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता शून्यावर आलेली नाही. तुम्ही कोणत्या चष्म्यातून बघता यावर ते अवलंबून आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील पत्रकारिता अशी तुलना होऊ शकत नाही. प्रेक्षकांमध्ये ‘मॅच्युरिटी’ (समाजभान) येणे गरजेचे आहे. शेवटी टीव्हीचा रिमोट प्रेक्षकांच्या हातात आहे, असे मत इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या नम्रता वागळे यांनी व्यक्त केले. पत्रकारांच्या
समस्यांवर देखील त्यांनी आवाज उठवला. विश्वासार्हता संपली असती तर एवढे लोक या कार्यक्रमाला आलेच नसते, असे मत अरुण समुद्रे यांनी व्यक्त केले. विश्वासार्हता शून्यावर येऊन ठेपली आहे, असे ज्यांना वाटते त्याला जबाबदार कोण हा प्रश्न विचारणे अधिक गरजेचे आहे. विश्वासार्हता दोन्ही बाजूने जपणे आवश्यक आहे. वाचक, श्रोता, दर्शक हा जर ग्राहक असेल तर त्यांनीदेखील विचार
करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रदीप नणंदकर म्हणाले, की वृत्तपत्र हे वृत्तपत्र नसून तो एक वसा आहे. वृत्तपत्रातील बातमी खरी का खोटी यावर विश्वास कसा ठेवायचा; कारण पॅकेजच्या विश्वात पत्रकारिता हरवली आहे. जाहिरातीचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. संपादकीय विभागापेक्षा जाहिरात
विभागाला अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळे विश्वासार्हता
शून्यावर नव्हे तर उणे होत चालली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण जाहुरे यांनी केले तर आभार प्रा. कैलास कांबळे यांनी मानले. समन्वयक प्रा. डॉ. बी. एस. भुक्तरे, सहसमन्वयक अखिल मणियार यांनी सहकार्य केले.