महाराष्ट्र खाकी ( उदगीर / प्रशांत साळुंके )– ज्ञानोबा माऊली, संत तुकाराम महाराज, भारतीय संविधान ग्रंथ, छत्रपती शिवाजी महाराज आदी प्रभूतींच्या नामजयघोषात शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यापासून ग्रंथदिंडीला सकाळी सुरूवात झाली. मूर्तीशास्त्राचे अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ९५ व्या अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तीन दिवसांचा सोहळा आजपासून सुरू झाला. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील, ना. संजय बनसोडे, संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मुख्य समन्वयक दिनेश सास्तूरकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. दिंडीची सुरुवात ग्रंथपूजनाने झाली. दिंडीत
महाराणी जीजामाता, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराजांच्या वेशभूषेत अनुक्रमे गीतांजली रेड्डी, प्रेरणा रेड्डी आणि संस्कार रेड्डी हे अश्वारूढ होते. डोईवर कलश, तुळस घेतलेल्या पारंपरिक वेशभूषेतील महिलादेखील दिंडीच्या रंगसंगतीत भर घालत होत्या. रंगीत फेटेधारी पुरूषांसह महिलांचा सहभाग, नवरसांची संकल्पना घेऊन नऊ रंगांच्या टोप्याधारी विद्यार्थी,
विठूनामाच्या गजरात टाळ मृदंगासह नृत्य करणारी बालगोपाळ मंडळी, महाराष्ट्राच्या मैदानी खेळांतील शारीरिक कवायतींचे प्रदर्शन करणारे सैनिकी शाळेचे विद्यार्थी, जय हिंद स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पारंपरिक गुगळ नृत्य, शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम पथक असे देखणे चित्र उदगीरच्या पथकावर पहायला मिळाले तर मोराचा चित्ताकर्षक चित्ररथ लक्षवेधक ठरला.
ग्रंथदिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांची वाहनधारी रॅली. यात 11 बुलेटधारी महिला तसेच स्कूटीवरील 120 महिला आणि 120 पुरूष सायकलींसह सहभागी होते. मराठवाड्याचा सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक इतिहास दर्शविणारे विविध संदेशात्मक चित्ररथ ग्रंथदिंडीत होते. याशिवाय ढोल, लेझीमसह वासुदेव, गोंधळी आणि अन्य लोककला सादर करणारे 150 कलावंतही ग्रंथदिंडी
सहभागी होते. ठिकठिकाणी माय मराठीचा जल्लोष, फुलांच्या रांगोळ्या, रंगांच्या पायघड्यांनी संभेलनस्थळाकडे जाणारा मार्ग सुशोभित करण्यात आला होता. पारंपरिक वेशभूषेतील स्त्री-पुरूषांसह दिंडीत सहभागी समस्त मान्यवर आणि साहित्यप्रेमी शिरावर मानाचा फेटा मिरवताना आढळून आले.