महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके) – निलंगा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या देवणी तालुक्यातील धनेगाव उच्च पातळी बंधार्यातून शेती पिकासाठी व गावकर्यांची तहान भागविण्यासाठी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी दहा दिवसापुर्वीच करण्यात आली आहे. सदर मागणी योग्य असून पाणी सोडल्यास जून अखेरपर्यंत बंधार्यात पाणी शिल्लक राहू शकते असा निर्वाळा संबंधित विभागाने
दिलेला आहे. मात्र केवळ आणि केवळ पालकमंत्र्यांच्या निष्क्रीयतेेमुळे आणि त्यांच्या दुर्लक्षानेे अद्यापर्यंत या बंधार्यातून पाणी सोडले नसल्याने जवळपास दहा गावातील नागरिक व शेतकरी पाण्यापासून वंचीत असल्याचे आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असून दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढणार असल्याची माहिती हवामान
खात्याने दिलेली आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची टंचाई निर्माण झालेली असून अनेक शेतकर्यांच्या शेती पिकाचे पाण्याअभावी नुकसानही होत आहे. सदर बाब लक्षात घेऊनच निलंगा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या देवणी तालुक्यातील धनेगाव उच्च बंधार्यातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी देवणी व निलंगा तालुक्यातील नागरिकांनी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे
केली होती. त्या अनुषंगाने आ. संभाजी पाटील निलंगेकरांनी संबंधीत विभागाच्या कार्यालयासह जिल्हाधिकर्यांकडे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी दि. 3 एप्रिल रोजी पत्राद्वारे केली होती. या पत्राच्या अनुषंगाने पाटबंधार्याच्या विभागाने धनेगाच उच्च बंधार्यातून पाणी सोडण्यास कांही हरकत नसून पाणी सोडले तरी जून अखेरपर्यंत पुरेसे पाणी शिल्लक राहिल असा निर्वाळा दि.
4 एप्रिल रोजी पत्राद्वारे जिल्हाधिकर्यांना दिला आहे.
धनेगाव उच्च बंधार्यात मुबलक पाणी साठा असून अद्यापर्यंत पाणी सोडललेे नाही. पालकमंत्री यांची निष्क्रीयता आणि दुर्लक्ष या कारणामुळे पाणी सोडले नसल्याचे सांगून आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पाणी असूनही नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची व शेतकर्यांचे नुकसान होत असल्याचे आ.
निलंगेकरांनी स्पष्ट केले आहे. यावरूनच पालकमंत्र्यांना शेतकर्यांसह सर्वसामान्यांशी कांही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत असून लवकरात लवकर बंधार्यातून पाणी नाही सोडल्यास नागरिकांची व शेतकर्यांची आणखीन होरपळ होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन लवकर पाणी नाही सोडल्यास देवणी व निलंगा तालुक्यातील नागरिकांसह आपण स्वतः आंदोलन करू असा इशारा आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.