महाराष्ट्र

आमदार अभिमन्यू पवार यांच्या मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज शुभारंभ

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – शासकीय योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचविण्यासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी हाती घेतलेल्या मनरेगातून ग्रामसमृद्धी या अभियानाच्या दुसर्‍या टप्प्याचा शुभारंभ कासारसिरसी (ता. निलंगा) येथून दि. 11 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. शेतकऱ्यांना सर्व योजनेची माहिती देणे,अर्ज भरून घेणे व मंजुर करणे या उद्देशाने हे अभियान हाती घेण्यात आले आहे.

आ. अभिमन्यू पवार यांनी गतवर्षी हाती घेतलेल्या या अभियानामुळे मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांना मनरेगातील योजनेचा लाभ घेता आला. गतवर्षी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करीत त्यांनी या योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केल्यामुळे मतदारसंघात शेतरस्ते मातीकाम, मनरेगाअंतर्गत फळबाग लागवड, गोठे, शेततळे, सिंचन विहीरी,रेशीम लागवड, सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प बांधकाम, बिहार पॅटर्न अंतर्गत

वृक्षलागवड, शिव रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड अशी शेकडो कामे सध्या सुरू आहेत. यामुळे या अभियानाचा दुसरा टप्पा 11 एप्रिल पासून 15 मे पर्यंत कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाच्या सहकार्याने मतदारसंघात राबविण्यात येणार आहे.यावेळी सरस्वती मंगल कार्यालय कासारसिरसी येथे होणाऱ्या या अभियानानिमित्त आयोजित कार्यशाळेचे उद्घाटक अध्यक्ष लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, तर प्रमुख पाहुणे म्हणून

लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे उपस्थित राहणार आहेत. आ. अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या अभियानात मतदारसंघातील 132 गावांच्या दौऱ्यात विविध योजनेबाबत गाव पातळीवर शेतकऱ्यांच्या बैठका घेवून त्यांना मार्गदर्शन करणे त्यांचे अर्ज भरून घेवून त्यांना मान्यता देण्याबाबत व योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत

पोहोचविणे हा मुख्य उद्देश आहे. या अनुषंगाने 27 मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते 1 हजार किमी मातीकाम झालेल्या शेतरस्त्यांचे, 500 किमी मजबुतीकरण झालेल्या शेतरस्त्यांचे, जनावरांसाठीच्या 1 हजार गोठ्यांचे, 1 हजार हेक्टर फळबागेचे व 1 हजार सिंचन विहीरींचे लोकार्पण तसेच 1 हजार शेततळे, 1

हजार नाडेफ कंपोस्ट खत प्रकल्प, 1 हजार वर्मी कंपोस्ट खत प्रकल्प व 1 हजार जिवामृत प्रकल्प कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 11 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या मनरेगातून ग्रामसमृद्धी या अभियानात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहात विविध योजनेचा लाभ घेवून आपली आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन आ. अभिमन्यू पवार यांनी केले आहे.

Most Popular

To Top