लातूर शहरात स्वयंपाक घरातील गॅस पाईप द्वारे मिळणाऱ्या योजनेचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उदघाटन

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) गॅस बुक करा, तो मागवा, घरी कोणी असेल तर ठिक नाहीतर तो रिकामा गॅस काढून हा 14 किलोचा भरलेला गॅस बसवा या कटीकटीतून लातूर शहरातील महिलांची सुटका झाली असून आज पासून पाईप द्वारे तुमच्या स्वयंपाक घरात गॅस लातूर महानगरपालिकेच्या पुढाकाराने अशोक गॅस ( युनिसॉन एनव्हायरो प्रायव्हेट ली.) यांच्या वतीने मराठवाड्यातला पहिला प्रकल्प कार्यान्वित होत असल्याची घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज केली.

लातूर शहरातील औसा रोड वरील बिडवे लॉन्सच्या समोरच्या बाजूस आज पाईप लाईन द्वारे घरगुती गॅस वितरण व्यवस्थेचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त अमन मित्तल, युनिसॉन एनव्हायरो प्रायव्हेट ली. अशोक गॅस चे मुख्यकार्यकारी अधिकारी मुकुंद चांडक, लातूर महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते दिपक सूळ, नगरसेवक अशोक गोविंदपूरकर,किरण जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.

येणाऱ्या काळात लातूर महानगरपालिकेचा विकास झपाट्याने करण्यासाठी अनेक योजना असून घरोघरी पाईपने गॅस पुरवठा करणारे देशातील पहिले शहर व्हावे असा आमचा प्रयत्न असून 16 ऑक्टोबर रोजी याचे आपण भूमिपूजन केले होते आणि अत्यंत कमी कालावधीत हा प्रकल्पाचे उदघाट्न झाले. आज 101 घरामध्ये आज पासून पाईप द्वारे गॅस वितरित होतो आहे, हे आपल्यासाठी आनंद देणारी गोष्ट असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.

येत्या दोन वर्षात लातूर शहरातील सर्व घरात पाईप लाईनने गॅसपोहचविण्याचे आव्हान अशोक गॅस ने स्विकारले असून स्वच्छ आणि शून्य टक्के गळती असणारा हा गॅस वापरणार शहर म्हणून आपल्याला लातूरचा लौकिक वाढविण्याचे काम करु या तसेच लातूर शहराचे प्रदूषण कमी करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ते ते केले जाईल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

प्रदूषण मुक्तीसाठी लातूरने पुढाकार घ्यावा

लातूर मध्ये आता 10 सीएनजी स्टेशन झाले आहेत. सीएनजी वर चालणाऱ्या गाड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी पॅरिस अग्रीमेंटवर जगभरातल्या देशांनी सह्या केल्या आहेत. त्यात आपलाही देश आहे, त्यामुळे आता ग्रीन ऊर्जा वापरावर भर देण्याचा प्रयत्न आपल्याकडून व्हायला हवा. इथून पुढे इथेनॉल, सौर ऊर्जा, इलेक्ट्रिकल या ऊर्जा वापरण्याचे प्रमाण वाढवायचे आहे. लातूर मध्ये अतुल देऊळगावकरांसारखे पर्यावरणात काम करणारी लोकं राहतात त्यांचा सल्ला महानगरपालिकेने घ्यावा असे आवाहन करून आपण साखर कारखान्यांचे बॉयलर सी एन जी वर चालवण्याचा प्रयत्न करणार असून एम आय डी सी मध्येही सी एन जी सारख्या प्रदूषण मुक्त एनर्जीचा वापर करण्यावर भर देण्याची गरज पालकमंत्री यांनी यावेळी बोलून दाखविली.

लातूर मध्ये होणार वेस्ट एनर्जी प्रकल्प

कचऱ्यापासून एनर्जी निर्माण करणारा प्रकल्प लातूर मध्ये सुरु करण्यात येणार असून यातून निर्माण होणारी ग्रीन एनर्जी उद्योगासाठी वापरली जाणार असल्याची माहिती देऊन या प्रकल्पामुळे लातूर शहर कचरामुक्त होईल तसेच ज्या कचऱ्याच्या ढिगासाठी नॅशनल ग्रीन ट्रीब्युनलकडून नोटीस मागे नोटीस येतात त्या ठिकाणी या वेस्ट एनर्जी प्रकल्पामुळे कचऱ्याचे ढीग जाऊन पब्लिक पार्क होईल,पिकनिक स्पॉट होईल अशी अपेक्षा पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.

लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले, जे जे नवे, ते ते लातूरला हवे.. हा स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा पॅटर्न पालकमंत्री अमित देशमुख यांनी कायम केला आहे. लातूरच्या प्रगतीसाठी मोठं काम होत असल्याचे त्यांनी यावेळी आपल्या मनोगतात विशद केले.

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे आणि महानगरपालिकेच्या सहकार्यामुळे विक्रमी कमी वेळात हा घरगुती गॅस पाईप लाईन ने देण्याचा प्रकल्प आम्ही सुरु करु शकलो हे सांगून लातूर शहरात अवघ्या 18 महिन्यात अशोक गॅस कडून सीएनजी स्टेशन अत्यंत यशस्वीपणे स्थिर झाले असून इतर मोठमोठ्या शहरात चार चार वर्षे लागले ते एवढ्या कमी कालावधीत झाल्यामुळे लातूरकरांच्या ग्रीन एनर्जी वापरण्याच्या सकारात्मकतेचे युनिसॉन एनव्हायरो प्रायव्हेट ली. अशोक गॅस चे मुख्यकार्यकारी अधिकारी मुकुंद चांडक कौतुक केले.

उदघाटन आणि पाईपच्या गॅसचा पहिला चहा

पालकमंत्री, महापौर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत घरगुती पाईप लाईन स्टेशनचे उदघाट्न झाल्यानंतर ज्या अपार्टमेंट मध्ये हे कनेक्शन दिले.. तिथली तोटी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते सुरु करण्यात आली आणि संदीप घोणसीकर हे या गॅसचे पहिले ग्राहक त्यांच्या घरी जाऊन पालकमंत्री अमित देशमुख, महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी चहा घेतला.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे