महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाअंतर्गत अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (fssai) तर्फे ‘इट राईट कॅम्पस’ हा उपक्रम राबविला जातो. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनातून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय पाकगृहाने या उपक्रमात सहभाग नोंदविला होता.यामध्ये खाद्यपदार्थांचा दर्जा, पाकगृहाची स्वच्छता, कर्मचारी वर्गाचे आरोग्य, पोषक आहाराबाबत जागरूकता या निकषांवरून मानांकन दिले जाते. या निकषांवरून पात्र ठरत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व रूग्णालयाने पंचतारांकित मानांकन मिळवले असून असा दर्जा मिळवणारे राज्यातील हे पहिलेच वैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे.
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांचा महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या नाविण्यपूर्ण उपक्रमांना सदैव पाठिंबा असतो.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या यशाने लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असल्याची भावना व्यक्त करत महाविद्यालयाच्या संपूर्ण टीमचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या पुढाकाराने विविध उपक्रमांमध्ये हे वैद्यकीय महाविद्यालय सक्रीय सहभाग नोंदविण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असते. सदरील उपक्रम हा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनातून राबविण्यात आला. याच्या यशस्वितेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे , पाकगृहाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती सुळे, आहारतज्ञ श्रीमती स्मिता डख, लिपीक अंगद शिंदे व पाकगृहातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तसेच यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.