महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – येत्या 6 डिसेंबर, 2021 रोजी भारतीय शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षापासून सुरु असलेल्या विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण ऑफ्रिकेमध्ये ओमिक्रॉन ही नवीन विषाणू चे आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजीतचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये / रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम, जेथे जास्त गर्दी होण्याची शक्यतो आहे असे कार्यक्रम टाळणे अपरिहार्य झालेले आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी अरविंद लोखंडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत दिनांक 6 डिसेंबर, 2021 रोजी साजरा करावयाच्या डॉ. बाबसाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनासंदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनासंदर्भात पुढीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दिनांक 6 डिसेंबर, 2021 रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येत आयोजित करावयाचा आहे.
कोविड -19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभागाचे परिपत्रक दिनांक 4 जून, 2021, सार्वजनिक आरोग्य विभाग आदेश दिनांक 11 ऑगस्ट, 2021 तसेच आदेश दिनांक 24 सप्टेंबर, 2021 अन्वये “ ब्रेक द चेन ” अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे.
महापरिनिर्वाण दिन हा भारतीयांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेल्या धोक्याचा विचार करता महापरिनिार्वण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे. तसेच शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी चैत्यभूमी, दादर मुंबई व लातूर जिल्ह्यातील इतर अभिवादन ठिकाणी न येता घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.
चैत्यभुमी दादर, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी जे व्यक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येथील त्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. तसेच औष्णिक पटेक्षण (Thermal Screening) च्या तपासणीअंती ज्यांचे शरिराचे तापमान सर्वसाधारण असले त्यांनाच सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग / संक्रमण वाढणार नाही.
दिनांक 6 डिसेंबर, 2021 रोजीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लातूर जिल्ह्यातील अभिवादन ठिकाणी कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ / पुस्तकांचे स्टॉल लावण्यात येवू नयेत. तसेच सदर परिसरात कोणत्याही प्रकारच्या सभा, धरणे, आंदोलने, निदर्शने व मोर्चा काढू नयेत.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम हा जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आयोजित करण्यात येत असल्याने त्या संदर्भात कोविड -19 च्या स्थानिक परिस्थितीचा विचार करुन आवश्यक ते सनियंत्रण व उपाययोजनाबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी निर्गमित करावेत.
कोविड -19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहीत केलेल्या नियमांचे काटेकारे पालन सर्व नागरिकांनी करावे तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष महापरिनिर्वाण दिन अभिवादन सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.
या आदेशाची काटेकारपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु, आदेशाची अंमलबजावणी करतांना सद्भावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुध्द कार्यवाही केली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अरविंद लोखंडे यांनी आदेशात नमुद केले आहे.