महाराष्ट्र खाकी ( कोल्हापूर ) – जिल्ह्यातील कोणतीही महिला अत्याचाराला बळी पडू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना गतीने राबवाव्यात अशा सूचना देऊन सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवा, नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तात्काळ दुरुस्ती करून घ्या, महिलांसाठीच्या 1091 हेल्पलाईनवर तात्काळ प्रतिसाद व मदत उपलब्ध करून द्या, संकटकालीन परिस्थितीत महिलांना जलद मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने ‘सुरक्षा ऍप’ कार्यान्वित करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.
महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पंकज देशपांडे, प्र. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आंबले, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगले , विधी सल्लागार आशिष पुंडपळ, तसेच समिती सदस्य उपस्थित होते.
महिलांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यावर भर
महिला व बाल विकास विभागाच्या महिलांसाठीच्या विविध योजना, त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक दूरध्वनी क्रमांक व हेल्पलाईन क्रमांक आदी विषयांची माहिती महिलांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. यासाठी प्रशिक्षित महिलांची टीम तयार करून त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागात प्रत्यक्ष जावून माहिती देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने नियोजन करावे, अशा सूचना देवून महिलांच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांचे सक्षमीकरण करण्यावर भर देऊया, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.
महिलांसाठीच्या हेल्पलाइनची जिल्हाधिकारी रेखावर यांनी फोन करून केली खात्री
बैठकी दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 1091 या महिलांसाठीच्या हेल्पलाइन क्रमांकावर स्वतः फोन करून हा नंबर सुरू असल्याची खात्री केली. तसेच संकटग्रस्त महिलांना तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या.
अत्याचार झालेल्या महिलांसाठी ‘वन स्टॉप सेंटर’ नवीन जागेमध्ये सुरू होण्यासाठी महिला बाल विकास विभागाने महसूल विभागाकडे तात्काळ प्रस्ताव सादर करावा, यांसह महिला व बालविकास विभागाच्या विविध विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची विशेष काळजी घ्या
यावेळी कोरोनामुळे एक अथवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतली. या बालकांना महिला व बाल विकास विभागाच्या कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे, याबाबत माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना त्यांनी केल्या.
विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पंकज देशपांडे म्हणाले, जिल्हयातील कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची कायदेशीर पालकत्वाची न्यायालयीन कामकाजासाठी विधिसेवा प्राधिकरणाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे म्हणाल्या, कोरोनामुळे 8 अनाथ व 601एक पालक गेलेल्या मुलांची सध्यस्थिती जाणून घेण्यासाठी विभागाकडून प्रत्यक्ष भेट देवून तसेच त्यांना कॉल करून वेळोवेळी माहिती घेऊन त्यांना आवश्यक ती मदत पुरविली जात आहे.