महाराष्ट्र

खबरदार अवैध सावकारी कराल तर, आंबेगाव तालुक्यातील एकावर फौजदारी कारवाई

महाराष्ट्र खाकी ( आंबेगाव ) – पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुट्रुक येथे अधिकृत सावकारी परवाना नसताना अवैधरित्या खासगी सावकारी व्यवसाय करून गरजू व्यक्तींना पैसे देऊन व्याज स्वरूपात पैसे घेऊन गरजू व्यक्तींची आर्थिक पिळवणूक केल्या प्रकरणी गंगाधर दगडू गोरे राहणार अवसरी बुद्रुक याच्याविरुद्ध मंचर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या बाबतची तक्रार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मंचर येथील अधिकारी मनीषा हरिभाऊ नाईकनवरे यांनी दिली आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील सहाय्यक निबंधक सरकारी संस्था कार्यालयात दि. 22 रोजी सुरेश जयवंत मांदळे राहणार अवसरी बुद्रुक व अशोक हृदयनारायण तिवारी राहणार नारायणगाव या दोघांनी गंगाधर गोरे याच्याविरुद्ध अवैध सावकारी करत असल्याचा तक्रारी अर्ज केला होता. त्यासंदर्भात प्राथमिक चौकशी करून महाराष्ट्र सरकारी अधिनियमन 2014 मधील तरतुदीनुसार मंचर पोलिसांशी पत्र व्यवहार करून यातील गंगाधर गोरेच्या राहत्या घरी पोलिस बंदोबस्त घेऊन सावकाराचे निबंधक तथा सहाय्यक निबंधक अधिकारी P. S. रोकडे, सहाय्यक सरकारी अधिकारी S. G. लादे, S. S. चौधरी, दोन पंच यांनी धाड मारून घराची झडती घेतली असता गोरे यांच्याकडे कोरे सहीचे चेक/ कोऱ्या सह्याचे स्टॅम्प पेपर ,रजिस्टर ,सहीचे रेव्हीन्यू स्टॅम्प, इत्यादी संशयास्पद कागदपत्रे मिळून आले.

यावरून गंगाधर गोरे हा अवैध सावकारी व्यवसाय करून तक्रार अर्जदार यांच्याकडून व्याजाची आकारणी करून गरजू व्यक्तींची आर्थिक पिळवणूक करत असल्याची खात्री झाल्याने गोरेच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार डावखर करत आहे.

Most Popular

To Top