महाराष्ट्र खाकी (गडचिरोली) – दोन दिवसाखाली गडचिरोली जिल्ह्यातील पैडी जंगल परिसरात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत कसनसुर दलमच्या १३ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले. या उल्लेखनीय कारवाईबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोली पोलीसांचे कौतुक केले आणि आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले .
यावेळी त्यांनी अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील कटेझरी येथील अतिसंवेदनशील पोलीस मदत केंद्राला भेट दिली. कटेझरी पोलीस मदत केंद्र हे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या अगदी शेवटच्या टोकावर वसलेले पोलीस मदत केंद्र आहे. यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यामुळे जवानांचे मनोबल उंचावले आहे. जवानांनी गृहमंत्र्यांशी संवाद साधला. तसेच चांगल्या घरांची मागणी केली. गृहमंत्र्यांनी स्वतःहून जवान राहत असलेल्या घरांची पाहणी करुन त्यांच्या कुटुंबियांची विचारपुस केली. चांगल्या घरांच्या मागणीबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिले.