महाराष्ट्र खाकी (कोल्हापूर) – लक्षणं दिसताच नागरिकांनी अधिक वेळ न घालवता उपचार घ्यावा. रूग्णाच्या आरटीपीसीआर रिपोर्टची वाट न पाहता आधी त्याच्यावर उपचार सुरू करावेत, अशी सूचना देतानाच लहान मुलांच्या उपचारासाठीही व्हेंटिलेटरची व्यवस्था तयार ठेवावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिले.
कोरोना आजार प्रतिबंध उपाययोजना आणि लसीकरण आढावा बैठक ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेतली. बैठकीला आमदार राजेश पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील मृत्यूदर कसा रोखता येईल, याबाबत ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी विशेष भर दिला. ते म्हणाले, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जे-जे आवश्यक आहे ते-ते करा. सद्याच्या संचारबंदीचे काटेकोर पालन करावे. त्यामुळे संसर्ग कमी होण्यास मदत होईल. जिल्ह्याला आवश्यक असणारा प्राणवायुचा पुरवठा, औषधे, रेमडेसिव्हीर आणि ॲन्टीजेन किट याची व्यवस्था केली जाईल, असे सांगून त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, नोडल अधिकारी सच्चिंद्रप्रताप सिंह यांच्याशी थेट मोबाईलवर संपर्क साधला.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशीही संपर्क करत त्यांनी टास्कफोर्स पाठविण्याची सूचना करून जिल्ह्याला 10 मे.टन प्राणवायुचा पुरवठा करण्यास सांगितले. ग्रामीणस्तरावर आवश्यकतेनुसार संस्थात्मक अलगीकरणावर भर द्यावा, असेही ते म्हणाले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी संगणकीय सादरीकरण केले. अपर जिल्हाधिकारी श्री. पवार, आयुक्त डॉ. बलकवडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण यांनीही यावेळी सद्य परिस्थितीचा आढावा दिला.